BCCI statement on Rohit Sharma and Virat Kohli : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारताला १-२ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला मालिकेत पराभव पत्करावा लागला. मात्र शेवटच्या वनडे सामन्यात संघाचे दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा फॉर्मात परतल्याचे पाहायला मिळाले.
मालिकेतील पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर विराट कोहलीने पुढच्या दोन्ही सामन्यांत शानदार अर्धशतके झळकावली. त्याने कार्डिफमध्ये ६५, तर लॉर्ड्सवर ७४ धावांची खेळी केली. दुसरीकडे, पहिल्या दोन सामन्यांत फ्लॉप ठरलेल्या रोहित शर्माने लॉर्ड्सवरील शेवटच्या वन-डेमध्ये त्याची कसर भरून काढली. 'हिटमॅन' रोहितने शेवटच्या सामन्यात १३८ धावांची धडाकेबाज शतकी खेळी साकारली. या भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांच्या यादीत या दोन्ही भारतीय दिग्गजांनी स्थान मिळवले आहे. आता ही मालिका संपल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) रोहित आणि विराटच्या कामगिरीवर मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यातील रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. 'एएनआय'शी बोलताना राजीव शुक्ला म्हणाले, "आजचा सामना नक्कीच अटीतटीचा झाला, यात शंका नाही. इंग्लंडने खूप जास्त धावा केल्या. त्यांनी शेवटच्या ३ षटकांत तब्बल ६० धावा लुटल्या आणि तिथेच आपली थोडी अडचण झाली; पण आमच्या फलंदाजांनीही चोख प्रत्युत्तर दिले, विशेषतः आपले 'आयकॉन्स' विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी. त्यांनी आजही तेच जागतिक दर्जाचे मजबूत फलंदाज आहेत आणि त्यांच्यात अजूनही भरपूर क्रिकेट बाकी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले."
राजीव शुक्ला यांनी भारतीय संघाच्या बॅटिंग लाईनअपवर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, "माझ्या मते, आजच्या सामन्यातील सर्वात मोठी सकारात्मक बाजू म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली आणि त्यानंतर शुभमन गिलची फलंदाजी होती. त्यामुळे संघाचे कॉम्बिनेशन उत्तम आहे आणि काळजीचे काही कारण नाही. फक्त इंग्लंडने धावा जरा जास्त केल्या, ज्यामुळे आपल्याला या पराभवाचा सामना करावा लागला."
या सामन्यात इंग्लंडने बेन डकेटच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर ३८७ धावांचा डोंगर उभा केला होता. डकेटने १४१ धावांची खेळी केली, लॉर्ड्सच्या मैदानावर ही कोणत्याही फलंदाजाने वन-डे क्रिकेटमध्ये केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने शानदार शतक ठोकले, तर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी करत झुंज दिली. मात्र, निर्धारित ५० षटकांत टीम इंडिया ३६० धावांपर्यंतच मजल मारू शकली. परिणामी, भारताला हा सामना २७ धावांनी गमवावा लागला. त्याचबरोबर भारतीय संघाचा मालिकेतही पराभव झाला.