सिडनी : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून, यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या फोटोचा नेमका अर्थ काय, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न चाहते करत आहेत.
रोहितने सिडनी विमानतळावरील स्वतःचा एक फोटो पोस्ट करत त्याला वन लास्ट टाईम, सायनिंग ऑफ फ्रॉम सिडनी अशी कॅप्शन दिले आहे. या फोटोत रोहित पाठमोरा जात असताना दिसून येतो आहे.
यापूर्वी शनिवारीच, रोहितने म्हटले होते की, ऑस्ट्रेलियात खेळण्याचा त्याला नेहमीच आनंद मिळतो. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या खडतर एकदिवसीय मालिकेनंतर, हा त्याचा आणि विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियातील अखेरचा दौरा असू शकतो, असेही त्याने मान्य केले होते.
रोहित आणि कोहली दोघेही आता कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाले असून, केवळ एकाच प्रकारच्या क्रिकेटमध्ये वन-डेत खेळतात. मुळातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपन्न झालेल्या वन-डे मालिकेत ते प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात उतरले होते. केवळ एकाच प्रकारात खेळत असल्याने मॅच फिटनेस कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर अर्थातच असणार होते. यामुळे, त्यांच्या पुनरागमनाविषयी विशेष उत्सुकता होती. यात विराट पहिल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात बहरात परतला, तर रोहितने शेवटच्या सामन्यात दणकेबाज शतक फटकावत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्यात कसर सोडली नाही.
या दोन्ही फलंदाजांचे वन-डे क्रिकेटमधील भवितव्य काय असेल, यावर सातत्याने जोरदार अटकळ बांधली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहितच्या या ताज्या पोस्टमुळे या सर्व चर्चांना आणखी उधाण आले आहे.