Rohit Sharma SMAT: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना काल रायपूरमध्ये झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं भारतावर ४ विकेट्सनी विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. दुसऱ्या वनडे सामन्यात भारताकडून विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतकी खेळी केली. मात्र सलामीवीर रोहित शर्माला फारशी चमक दाखवता आली नाही. तो १४ धावा करून बाद झाला.
रोहित शर्मा दुसऱ्या वनडे सामन्यानंतर एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रोहित शर्मा मुंबईच्या संघात परतण्याच्या तयारीत आहे. जरी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सईद मुश्ताक अली ट्रॉफी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
रोहित शर्मा सध्या दक्षिण अफ्रिकेविरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. ही मालिका येत्या शनिवारी संपुष्टात येईल. त्यानंतर रोहित शर्मा १२ ते १८ डिसेंबर दरम्यान इंदौरमध्ये होणाऱ्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीच्या बाद फेरीत खेळण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या संघानं सईद मुश्ताक अली ट्रॉफीत लीग स्टेजमधील आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. ते सध्या एलिट ग्रुप A मध्ये १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. ही स्पर्धा लखनौ इथं होत आहे. मुंबई बाद फेरीत पोहचण्याची चांगली शक्यता आहे.
रोहितच्या खेळण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी सांगितलं की, 'रोहित शर्माने सईद मुश्ताक अली ट्रॉफीची बाद फेरी मुंबईकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.'
यापूर्वी बीसीसीआयने भारतीय संघातील सर्व खेळाडूंना आंतररराष्ट्रीय स्पर्धा खेळत नसताना किंवा दुखापतग्रस्त नसताना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची सक्ती केली होती.