Rohit Sharma viral video India vs South Africa ODI
नवी दिल्ली: युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शानदार शतक (नाबाद ११६) झळकावत, भारताला विशाखापट्टणम येथील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानेही (७५ धावा) मोलाचे योगदान दिले आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेने दिलेले २७१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. या सलामीच्या जोडीने २५.५ षटकांमध्ये १५५ धावांची भक्कम भागीदारी रचत विजयाचा पाया घातला. भारताने ३९.५ षटकांत केवळ एक गडी गमावून २७१ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. विराट कोहलीनेही ४५ चेंडूंमध्ये नाबाद ६५ धावांची जलद खेळी करत संघाला फिनिशिंग लाईनपर्यंत नेले.
रोहित शर्माने आपल्या ७५ धावांच्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार लगावले. १४ व्या षटकात एक धाव घेत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्या पंक्तीत बसणारा रोहित हा चौथा भारतीय ठरला, तर जागतिक स्तरावर हा पराक्रम करणारा तो १४ वा खेळाडू आहे. या खेळीमुळे रोहितच्या नावावर आता २०,०४८ धावा जमा झाल्या आहेत.
मालिका जिंकल्यानंतर टीम हॉटेलमध्ये झालेल्या सेलिब्रेशनदरम्यान एक गंमतीदार प्रसंग घडला. विराट कोहलीच्या सांगण्यावरून यशस्वी जैस्वालने केक कापला आणि तो केकचा एक तुकडा रोहितला भरवण्यासाठी पुढे सरसावला. यावेळी रोहितने हसत "नको, मी पुन्हा जाड होईन" असे म्हणत तो केक खाण्यास नकार दिला. तर, याचवेळी विराट कोहलीने मात्र केकचा आस्वाद घेतला.