Rohit Sharma World Cup Plan: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने नुकतेच इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेत लॉर्ड्सवर शतक ठोकलं. मात्र या शतकापूर्वी रोहितच्या निवृत्तीची खूप चर्चा झाली होती. रोहितचा हा शेवटचा सामना असल्याचं देखील बोललं गेलं. मात्र रोहितनं बॅटनं उत्तर तर दिलंच त्याचबरोबर त्याने मी कुठेही जात नाहीये असं सांगत निवृत्तीच्या अफवांना तिलांजली दिली.
मात्र असं असलं तरी अजूनही रोहित शर्माच्या मानगुटीवरून वनडे वर्ल्डकपपूर्वीचे निवृत्तीचं भूत काही उतरलेलं नाही. तो २०२७ च्या वनडे वर्ल्डकपच्या संघात असणार की नाही हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. गेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने कर्णधार आणि फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी केली होती.
वनडे फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा हा एक टॉपचा फलंदाज आहे. त्याच्या सध्याच्या फॉर्मबाबत देखील कोणाला शंका नाही. मात्र रोहित ३९ वर्षाचा असून त्याच्या फिटनेसबाबत चिंता आहे.
फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर ऑक्टोबर २०२५ पासून आतापर्यंत रोहितच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्या आहेत. त्याने १५ वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने २ शतकी खेळी केल्या आहेत. तर ४ वेळा ७० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. नुकतेच इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत त्याने १३८ धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
मात्र त्याच मालिकेत रोहित शर्मा वनडेमधून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू झाली होती. जवळपास त्याला नारळ देण्यातच आला होता.
रोहित शर्माच्या भविष्याबाबत सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असल्याबाबत माजी खेळाडू अजिंक्य रहाणेने देखील चिंता व्यक्त केली आहे. त्याने निवडसमितीला एक मोलाचा सल्ला दिला आहे. रहाणेच्या मते रोहित सारख्या मोठ्या खेळाडूबाबत सिरीज टू सिरीज पाहू हा ही भूमिका चुकीची आहे. रहाणेने बीसीसीआय आणि निवडसमितीने रोहित शर्मासोबत थेट चर्चा करायला हवी असं मत व्यक्त केलं.
जर तुम्हाला रोहित शर्माने २०२७ चा वर्ल्डकप खेळावा असं वाटत असेल तर त्याला याबाबत आश्वस्त केलं पाहिजे. जर खेळाडूचे डोके शांत असते त्यावेळी तो फ्री होतो. त्याचवेळी त्याचा नैसर्गिक खेळ चांगला बहरू शकतो.