स्पोर्ट्स

Rohit Sharma retirement : रोहित शर्मावर कोणताही दबाव नाही, निवृत्तीच्या चर्चांवर फलंदाजी प्रशिक्षकांचे मोठे विधान

Team India : ‘धावा निघाल्या नसल्या तरी रोहितचे महत्त्व कमी होत नाही.’

रणजित गायकवाड

Rohit Sharma pressure batting coach statement

लंडन : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा बॅटने विशेष कमाल करू शकलेला नाही. यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीच्या चर्चांनी अचानक जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर, कार्डिफ येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी रोहितच्या फॉर्मबाबत एक मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

‘रोहितसारख्या दिग्गजावर कोणताही दबाव असू शकत नाही’

कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला चार गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात सर्वांच्या नजरा ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या कामगिरीवर खिळल्या होत्या, परंतु ४७ चेंडूंत अवघ्या २६ धावा करून तो बाद झाला. रोहित तंबूत परतताच सोशल मीडिया आणि क्रीडा जगतात त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, असे अंदाज वर्तवले जाऊ लागले.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांना रोहितच्या फॉर्म आणि दबावाविषयी विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना कोटक म्हणाले, "रोहित शर्मासारख्या महान आणि अनुभवी खेळाडूवर कोणत्याही प्रकारचा दबाव असू शकत नाही. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर इतके क्रिकेट खेळले आहे की, अशा चर्चांमुळे त्याला काहीही फरक पडत नाही. पहिल्या दोन सामन्यांत त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नसल्या तरी त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही."

कोटक यांनी पुढे स्पष्ट केले की, "मी अनेक वर्षे क्रिकेट खेळलो आणि पाहिले आहे. काहीवेळा फलंदाजाला सुरुवातीला हवी तशी लय सापडत नाही, परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही की तो फलंदाज संघर्ष करतोय. कार्डिफच्या खेळपट्टीवर चेंडूला दुहेरी उसळी (डबल बाऊन्स) मिळत होती, ज्यामुळे फलंदाजांना काही अडचणी आल्या."

लॉर्ड्सवरील सामना ठरणार रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना?

भारतीय क्रिकेट संघ सध्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची रणनीती आखत असून, भविष्यातील संघाची बांधणी करण्याच्या उद्देशाने पुढे जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने रोहित शर्माला आधीच स्पष्ट केले आहे की, तो २०२७ च्या विश्वचषक योजनांचा भाग नाही.

त्यामुळेच, १९ जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळला जाणारा मालिकेतील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा रोहित शर्माच्या देदिप्यमान आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT