पुढारी मल्टिमीडिया टीम
मुंबई : 'मुंबईचा राजा' अशी ओळख निर्माण करणारा ख्यातनाम क्रिकेटपटू रोहित शर्मा केवळ मैदानातच चौकार-षटकारांची आतषबाजी करत नाहीत... तर आपल्या चाहत्यांच्या हृदयातही 'सिक्सर' ठोकतो... चाहत्यांची मनं कशी जिंकावीत, हे खरं तर रोहित शर्माकडून इतर खेळाडूंनी शिकायला हवं...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहितने, आपल्या एका मराठमोळ्या चाहत्याला दिलेल्या खास सरप्राईजमुळे तो क्रिकेट फॅन्सच्या गळ्यातील ताईत बनलाय.
मुलीचं नाव ठेवलं 'समायरा', 'हिटमॅन' चाहत्यावर खूष
तर त्याचं झालं असं की, गीतेश ठाकूर आणि ममता म्हात्रे ठाकूर हे जोडपं रोहित शर्माचे मोठे फॅन. नुकतेच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या लाडक्या खेळाडूवरील प्रेमापोटी त्यांनी आपल्या मुलीचे नावही रोहितच्या मुलीच्या नावावरून 'समायरा' असे ठेवले. विशेष म्हणजे, या चिमुकलीचं बारसं देखील अगदी रोहित शर्माच्या स्टाईलने साजरं करण्यात आलं. रोहित शर्माने स्लो मोशनमध्ये वर्ल्ड कपची ट्रॉफी स्वीकारली होती. त्याचीच नक्कल करत गीतेश ठाकूर यांनी मुलीच्या नावाचं बारसं केलं. रोहित शर्माच्या 45 नंबरची जर्सी त्यांनी उघड केली, तेव्हा त्यावर समायरा लिहिलेलं होतं.
रोहितचं 'मराठी' सरप्राईज
या बारशाचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित शर्मापर्यंत पोहोचला. आपल्या चाहत्याचे हे प्रेम पाहून रोहितही भारावून गेला. त्याने केवळ दखलच घेतली नाही, तर ठाकूर कुटुंबासाठी एक खास व्हिडीओ संदेश पाठवला. विशेष म्हणजे, रोहितने आपल्या चाहत्यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या.
'ठाकूर फॅमिली, तुम्हाला आमच्या शर्मा घरातून भरपूर शुभेच्छा.. तुम्हाला मुलगी झाली आम्हाला हे ऐकून बरं वाटलं. ऑल द बेस्ट.. मुलीला आणि तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा,' अशा शब्दांत रोहित शर्मानं आपल्या भावना व्यक्त केल्या.
ठाकूर कुटुंबाला अत्यानंद
रोहित शर्माचा हा व्हिडीओ संदेश पाहून ठाकूर कुटुंब भारावून गेले आहे. टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो आनंद झाला होता, तसाच अनुभव रोहितच्या फॅन्सनी साजरा केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून, 'मुंबईचा राजा' हा केवळ मैदानाचा नाही, तर माणुसकीचाही राजा आहे, अशा कमेंट्स चाहत्यांकडून येत आहेत.