पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार रोहित शर्माच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. त्याची पत्नी रितिका सजदेह हीने मुलाला जन्म दिला आहे. ते दोघेही दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. रिपोर्ट्सनुसार, रितिका हिने शुक्रवारी (दि.15) मुंबईत मुलाला जन्म दिला. या बातमीने रोहित आणि रितिकाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांना पुत्रप्राप्ती झाली असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय या आनंदाच्या बातमीने टीम इंडियाच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. कारण टीम इंडियाचा कर्णधार ऑस्ट्रेलिया मालिकेत सुरुवातीपासून खेळण्याची शक्यता वाढली आहे.
मागील काही आठवड्यांपासून रोहित लवकरच वडील होणार असल्याची चर्चा होती. ही आनंदाची बातमी कधी मिळेल याची फक्त प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षाही अखेर शुक्रवार (दि.15) संपली. भारतीय कर्णधाराने डिसेंबर 2015 मध्ये रितिकासोबत लग्न केले. यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्यांची मुलगी समायरा हिचा जन्म झाला. आता नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय कर्णधाराच्या कुटुंबात आणखी एक सदस्य जोडला गेला आहे आणि मुलगी समायरा हिला लहान भाऊ मिळाला आहे.
रोहित आणि त्याच्या कुटुंबासाठी तसेच टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे. मुलाच्या जन्माची वाट पाहत असताना रोहित आपल्या सहकारी खेळाडूंसोबत कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकला नाही. पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही, अशी अटकळ भारतीय कर्णधाराविषयी सतत वर्तवली जात होती, तर दुसऱ्या कसोटीत खेळण्याबाबत परिस्थिती स्पष्ट नव्हती. मात्र, आता या सर्व शंका दूर होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.