Rohit Sharma Batting Form: न्यूजीलंडविरूद्धच्या वनडे मालिकेत भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा बडोदा येथील सामन्यात २६ तर राजकोट येथील सामन्यात २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक टेन डोशेट यांनी रोहितच्या फॉर्मबाबत प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेनंतर वाद निर्माण झाला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डोशेट यांच्या वक्तव्यावर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. रेयान यांनी रोहितच्या कमी धावा या कमी सामने खेळल्यामुळे असू शकतात असे वक्तव्य केलं होतं.
त्यावर मनोज तिवारीने टेन डोशेन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द ही रोहित शर्माच्या रेकॉर्डपेत्रा ५ टक्के देखील नाही असं म्हणत टीका केली.
रोहित शर्माने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी केली होती. त्याने एक अर्धशतक आणि एक शतक ठोकत मालिकेत प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकवला होता. यानंतर त्याने दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत देखील चांगली कामगिरी केली होती. मात्र न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यात रोहितला लौकीकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतर आता सहाय्यक प्रशिक्षकांनी त्यावर टिप्पणी केली आहे.
दरम्यान, मनोज तिवारीने रेयान टेन डोशेट यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पीटीआयशी बोलताना मनोज तिवारी म्हणाला, 'रेयान टेन डोशेट माझ्यासोबत केकेआरमध्ये चार वर्षे राहिले आहेत. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. मात्र या प्रकारे वक्तव्य देताना त्यांनी थोडा विचार करायला हवा. त्यांनी नेदरलँड्स कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. मात्र पूर्ण आदर राखून सांगू इच्छितो की त्यांचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड हे रोहित शर्माच्या कारकिर्दीच्या ५ टक्के देखील नाहीये. रोहित फक्त फलंदाज नाही तर तो एक यशस्वी कर्णधार देखील राहिला आहे.'
रेयान टेन डोशेट यांनी जरी सामन्याच्या सरावाबाबत वक्तव्य केलं असलं तरी रोहित शर्माने गेल्या महिन्यात मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत दोन सामने खेळले होते. त्याने पहिल्या सामन्यात दमदार शतक ठोकलं होतं.
भारत आणि न्यूजीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेचा निर्णायक सामना हा १८ जानेवारीला इंदौरमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माने कसोटी आणि टी २० आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता रोहित शर्मा हा इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठा ब्रेकवर असणार आहे.