पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने गुरुवारी (दि.27) उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यत इंग्लंडविरुद्ध 68 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. 2014 नंतर टीम इंडिया पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. भारताच्या या विजयाने कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पावसाने केलेल्या खेळीमुळे सामन्याला विलंब झाला. या सामन्यात भारताने गतविजेत्या इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करून T20 क्रिकेट विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शनिवारी विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
या विजयासह भारताने 2022 मध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला. टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. यावेळी भावूक झालेल्या रोहितला विराट सावरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला विराटच्या रूपात पहिला धक्का बसला. यानंतर रोहितने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत 39 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 6 चौकाराच्या सहाय्याने अर्धशतकी खेळी केली. आपल्या खेळी दरम्यान त्याने सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. या भागिदारीच्या जोरावर भारतीय संघाने कठीण खेळपट्टीवर सात गडी गमावून 171 धावा केल्या.
यानंतर अक्षर (23 धावांत तीन विकेट) आणि कुलदीप (19 धावांत तीन विकेट) या फिरकीपटूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडचा डाव अवघ्या 16.4 षटकांत 103 धावांत गुंडाळला. जसप्रीत बुमराहने 2.4 षटकात 12 धावा देत 2 बळी घेतले. इंग्लंडकडून फक्त कर्णधार जोस बटलर (23), हॅरी ब्रूक (25), जोफ्रा आर्चर (21) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (11) दुहेरी आकडा गाठू शकले.