Rishabh Pant X post  Pudhari
स्पोर्ट्स

Rishabh Pant X post : रात्रीच्या १२:४६ वाजता ऋषभ पंतने केली 'एक्‍स' पोस्‍ट! मागितली 'भेटवस्तू'; CM धामींचा मोठा निर्णय!

सोशल मीडिया पोस्टमधील इंग्रजी व्याकरण आणि स्पेलिंग दोषांवर चाहत्‍यांनी ठेवले बोट

नंदू लटके

Rishabh Pant X post : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी तो क्रिकेटमधील फटकेबाजीमुळे नव्हे, तर रात्रीच्या वेळी सोशल मीडियावर केलेल्या एका मागणीमुळे चर्चेत आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे पंतने जमिनीसाठी घातलेली गळ आणि थेट "भेटवस्तू" (गिफ्ट) म्हणून जमिनीची केलेली मागणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ऋषभने व्‍यक्‍त केली उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्याची इच्छा

नेहमीच आपल्या बिनधास्त आणि हटके शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंतने शनिवारी मध्यरात्री १२:४६ वाजता ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली. दिल्लीहून आपले बस्तान हलवून मूळ राज्य उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त करत पंतने मुख्यमंत्र्यांना जमीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. मात्र, या पोस्टमधील इंग्रजीचे अनेक व्याकरण आणि स्पेलिंगचे दोष चाहत्यांच्या तात्काळ नजरेत आले.

ऋषभ पंतने पोस्टमधून नेमकी कोणती मागणी केली?

"@pushkardhami नमस्कार सर, कसे आहात? विशेषतः उत्तराखंडचा स्थानिक नागरिक म्हणून माझ्यासाठी हा बराच काळ गेला आहे. मी दिल्लीहून उत्तराखंडमध्ये शिफ्ट होण्यासाठी जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु राहण्यासाठी योग्य आणि मोठी जागा मिळत नाहीये. माझे माझ्या उत्तराखंडवर मनापासून प्रेम आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की, कृपया जमीन अधिग्रहणात मदत करा..." इतक्यावरच न थांबता, पंतने दुसऱ्या एका पोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल राज्य सरकारने भेटवस्तू म्हणून जमीन द्यावी, किंवा शासकीय दराने जमीन खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली.

पोस्टमधील इंग्रजी व्याकरण आणि स्पेलिंग दोषांवर चाहत्‍यांनी ठेवले बोट

पंतच्या या मध्यरात्रीच्या ट्विटवर क्रीडाप्रेमींनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्टमधील इंग्रजीचे अनेक व्याकरण आणि स्पेलिंगचे दोषांवर चाहत्‍यांनी ठेवले बोट "हा दारूच्या नशेत आहे का? रात्रीच्या १ वाजता इतक्या चुका असलेले एक्‍स पोस्‍ट करण्‍यामागील हेतू काय? सध्या भारतीय संघ कसोटी सामना खेळत असताना पंत अशा गोष्टीत व्यस्त कसा?" असा सवाल एका चाहत्याने उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे उत्तर

पंतच्या या व्हायरल पोस्टवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अत्यंत संयमी आणि कौतुकास्पद प्रतिक्रिया दिली. "प्रिय ऋषभ, तू उत्तराखंडचा अभिमान आहेस. तुझ्या उत्कृष्ट कामगिरीने तू देवभूमीचे नाव जगभरात उज्ज्वल केले आहेस. मातृभूमीवरील तुझे प्रेम आणि परत येण्याची भावना वाखाणण्याजोगी आहे. तू उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत. ते लवकरच तुझ्याशी संपर्क साधतील आणि नियमानुसार शक्य ती सर्व मदत करतील," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, आगामी श्रीलंका मालिकेसाठी पंतची भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. तसेच, आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सकडून १५ कोटी रुपयांच्या करारासह दिल्ली कॅपिटल्स संघात पुन्हा घेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT