Rinku Singh pudhari
स्पोर्ट्स

Rinku Singh: योगी आदित्यनाथांच्या हस्ते घ्यायचं होतं नोकरीचं नियुक्तीपत्र... रिंकू सिंहने मारली दांडी, कारण की राजकारण?

Anirudha Sankpal

Rinku Singh Government Job: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशातील एक उद्योनमुख खेळाडू आहे. नुकतेच भारतानं टी २० वर्ल्डकप जिंकला त्याचा तो सदस्य होता. उत्तर प्रदेश सरकारनं रिंकू सिंहला सरकारी नोकरी देऊन त्याच्या खेळातील योगदानाचा गौरव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र वितरण सोहळ्याला रिंकू सिंहने दांडी मारल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हे सरकारी नोकरी नियुक्तीपत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते देण्यात येणार होतं. हा कार्यक्रम लखनौच्या लोकभवनमध्ये आयोजित करण्यात आला होता.

राजकीय पार्श्वभूमी

विशेष म्हणजे रिंकू सिंहची आता एक राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. रिंकू सिंहचे काही महिन्यापूर्वीच समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत विवाह झाला आहे. रिंकू सिंहची उत्तर प्रदेशातील क्षेत्रीय क्रीडा अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. रिंकू कार्यक्रमाला का उपस्थित राहिला नाही याचं कारण अद्याप समजलेलं नाही मात्र राजकीय पार्श्वभूमीची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे.

इतर खेळाडूंचा सन्मान

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील इतर खेळाडूंना सन्मानित केलं. या कार्यक्रमात राज्यातील सहा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र दिलं. यात हॉकीपटू राजकुमार पाल आणि प्रवीण कुमार (पॅरालंम्पिक उंच उडी) यांना डीएसपी पद देण्यात आलं. तर पॅरालंम्पिक भालाफेकपटू अजित सिंह आणि सिमरन ( पॅरा अॅथलिट) जिल्हा पंचायत राज अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली.

दुसरीकडं प्रीतिपालला खंड विकास अधिकारी करण्यात आलं आहे. याचबरोबर पाच खेळाडूंना लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराअंतर्गत ३.११ लाख रूपये, कांस्य प्रतिमा आणि प्रशस्तीपत्र देण्यात येतं. या खेळाडूंमध्ये उत्तम सिंह (हॉकी), अभिजीत कुमार (जिम्नॅस्टिक), जोंटी कुमार (कुस्ती), यश कुमार ( पॅरा कॅनोईंग) आणि प्रवीण कुमार (पॅरा अॅथलिट) यांचा समावेश आहे.

चार महिला खेळाडूंना देखील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देण्यात आला. यात प्राची, तान्या चौधरी, प्रगत केसरवानी आणि वंतिका अग्रवाल यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना ३.११ लाख रूपये रोख, कांस्य प्रतिमा आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT