स्पोर्ट्स

Real Madrid Nazi salute controversy : रिअल माद्रिदच्या सामन्यात ‘नाझी सॅल्युट’..! ‘UEFA‘कडून स्पॅनिश क्लबला 16 लाखांचा दंड

UEFA Champions League : 'चॅम्पियन्स लीग'च्या प्ले-ऑफच्या सामन्यावेळची घटना

रणजित गायकवाड

Real Madrid Nazi salute UEFA fined 15000 euros to Spanish football club

माद्रिद : खेळ म्हणजे केवळ विजय-पराजय नव्हे, तर ती एक संस्कृती असते. मात्र, याच खेळाच्या मैदानात जेव्हा द्वेषाचे वारे वाहू लागतात, तेव्हा शिस्तीचा बडगा उगारणे अनिवार्य ठरते. फुटबॉल विश्वातील सम्राट मानल्या जाणाऱ्या रिअल माद्रिद क्लबला नुकताच असाच एक कडू डोस स्वीकारावा लागला आहे. एका चाहत्याच्या अश्लाघ्य वर्तनामुळे 'युएफा'ने (UEFA) या बलाढ्य क्लबला १५,००० युरोंचा (सुमारे १७,३६४ डॉलर्स, १६ लाख रुपये) जबर दंड ठोठावला आहे.

मैदानातील तो 'कलंकित' क्षण

गेल्या आठवड्यात सँटियागो बर्नाबेउच्या हिरवळीवर 'चॅम्पियन्स लीग'च्या प्ले-ऑफचा थरार रंगला होता. रिअल माद्रिद आणि बेनफिका यांच्यातील या लढतीत चाहते आपल्या लाडक्या संघाचा जयजयकार करत होते. मात्र, याच उत्साहाच्या महापुरात एका चाहत्याने माणुसकीची सीमा ओलांडली. त्याने केलेल्या 'नाझी सॅल्युट'च्या त्या एका कृतीने खेळभावनेला काळिमा फासण्याचा प्रकार घडला. कॅमेऱ्याच्या तीक्ष्ण नजरेतून ही आक्षेपार्ह घटना सुटली नाही आणि क्रीडा विश्वात वांशिक भेदभावाचा हा विषारी विंचू डसला गेल्याची जाणीव झाली.

क्लबची कठोर कारवाई : 'त्या' चाहत्याची कायमची हकालपट्टी

रिअल माद्रिदने या घटनेची दखल घेताना 'शून्य सहिष्णुता' (Zero Tolerance) धोरणाचा अवलंब केला. क्लबच्या सुरक्षा रक्षकांनी थे प्रेक्षक गॅलरीत धडक मारली आणि त्या संबंधित चाहत्याची ओळख पटवून त्याला तातडीने स्टेडियमबाहेरचा रस्ता दाखवला. ‘क्रीडा क्षेत्रात द्वेषाला आणि वर्णद्वेषाला तीळमात्र जागा नाही,’ असा कडक संदेश देत क्लबने त्या सदस्याचे सदस्यत्व कायमचे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दंडाची टांगती तलवार आणि विजयाचा गुलाल

केवळ आर्थिक दंडच नव्हे, तर युएफाने शिस्तीचा वस्तूपाठ घालत पुढील सामन्यासाठी स्टेडियमचा एक भाग (लोअर साऊथ स्टँडमधील 500 जागा) बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, ही शिक्षा सध्या एका वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे. असे असले तरी क्लबच्या प्रतिमेला लागलेला 'नाझी सॅल्युट'चा हा डाग पुसणे कठीण आहे.

दुसरीकडे, मैदानातील संघर्षात रिअल माद्रिदने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. बेनफिकाचा २-१ असा पराभव करत, एकूण ३-१ च्या फरकाने त्यांनी दिमाखात 'राउंड ऑफ १६' मध्ये प्रवेश केला आहे. आता पुढील फेरीत त्यांचा सामना मँचेस्टर सिटी या महाबलाढ्य संघाशी होणार आहे. विजयाचा आनंद असला, तरी शिस्तीच्या या तडाख्यामुळे माद्रिदच्या गोटात सध्या संमिश्र वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT