RCB IPL 2026 Champion: IPL 2026 च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा आपली छाप सोडत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (RCB) ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत RCB ने गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरले.
सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 बाद 155 धावा केल्या. संघासाठी वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक झुंज देत 37 चेंडूत 50 धावांची खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. शुभमन गिल 10, साई सुदर्शन 12 आणि जोस बटलरही कमी धावा करुन बाद झाल्याने गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
RCB च्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. जोश हेजलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर रसिख सलाम डारने तीन विकेट्स घेत गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडले. कृणाल पंड्यानेही एक महत्त्वाचा बळी घेतला.
156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB ला विराट कोहलीने दमदार सुरुवात करून अर्धशतक ठोकले. विशेष म्हणजे, IPL कारकिर्दीतील हे त्याचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. आपल्या 19 व्या IPL हंगामात, तेही अंतिम सामन्यासारख्या दबावाच्या क्षणी, विराटने युवा टी-20 फलंदाजांनाही लाजवेल अशी फलंदाजी केली.
कोहलीने अवघ्या 11.2 षटकांत संघाला 113 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. या हंगामात त्याने 648 धावा करत 167.01 च्या स्ट्राइक रेटने खेळ केला आहे. IPL 2026 मध्ये 600 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वैभव सूर्यवंशी आणि ईशान किशन यांच्यानंतर सर्वाधिक वेगाने धावा करणारा फलंदाज म्हणूनही त्याने आपली छाप सोडली.
एकीकडे विराटचा अनुभव आणि दुसरीकडे RCB च्या गोलंदाजांची शिस्तबद्ध कामगिरी यामुळे गुजरातला पुनरागमनाची संधीच मिळाली नाही. या विजयासह RCB ने सलग दुसरे विजेतेपद जिंकत IPL इतिहासात आणखी एक सुवर्ण अध्याय लिहिला. अंतिम सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मोठ्या सामन्यांचा खरा बादशाह कोण आहे.