Rcb Victory Parade Stampede (file photo)
स्पोर्ट्स

Rcb Victory Parade Stampede | बंगळूर चेंगराचेंगरी : KSCA ने स्वीकारली नैतिक जबाबदारी, दोन पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

IPL 2025 जिंकलेल्या Rcb चा विजयोत्सव पाहण्यासाठी जमली होती मोठी गर्दी, चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

Rcb Victory Parade Stampede

बंगळूऱ : येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ गेल्या बुधवारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ७५ जण जखमी झाले. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. केएससीएचे सचिव ए. शंकर आणि खजिनदार ए. ई. जयराम यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांनी संयुक्त निवेदन जारी करत या निर्णयाची पुष्टी केली.

"गेल्या दोन दिवसांत अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना घडल्या आणि आमची भूमिका खूपच मर्यादित असली तरी, आम्ही याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आहोत. आम्ही केएससीएच्या सचिव आणि खजिनदार राजीनामे सादर केले आहेत," असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शंकर आणि जयराम यांची बंगळूरमधील प्रसिद्ध ऑडिटर म्हणून ओळख आहे. त्यांच्याकडे तीन वर्षांपासून केएससीचे मानद पद होते. दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संतप्त भावना व्यक्त झाल्या. केएससीच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव वाढला होता. यामुळे दोन पदाधिकारी पायउतार झाले आहेत.

KSCA पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

तब्बल १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाचा परमोच्च आनंद अल्पजीवी ठरला. आरसीबीचा विजयोत्सव पाहण्यासाठी बुधवारी हजारो चाहत्यांनी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकाचवेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शंकर आणि जयराम यांच्यासह इतर केएससीए अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले.

बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी ६ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (आरसीबी)चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे याच्‍यासह अन्‍य तिघांनाही अटक करण्‍यात आली होती. ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए नेटवर्क्सशी संबंधित आहेत. तर केएससीएचे सचिव शंकर आणि खजिनदार जयराम यांच्याही घरी पोलिसांनी धडक दिली होती. मात्र ते घरी नव्‍हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT