

बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी आज (दि.6) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (आरसीबी)चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे याच्यासह अन्य तिघांनाही अटक करण्यात आली आहे. ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए नेटवर्क्सशी संबंधित आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) चे सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांच्याही घरी पोलिसांनी धडक दिली. मात्र ते घरी नव्हते. पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत.
निखिल सोसाळे हे विमानाने मुंबईला जाण्याच्या तयारीत होते. त्यांना बंगळूरु विमानतळावर अटक करण्यात आली. त्याची चौकशी सुरू आहे. डीएनएचे इतर 3 कर्मचारी किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांना क्यूबन पार्क पोलिस ठाण्यात आणले आहे, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे. चेंगराचेंगरीत निष्काळजीपणाचे कारण, नियम, कार्यक्रमाची परवानगी आणि सुरक्षा मानकांशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष याबाबत पोलीस तपास करत आहेत.
१८ वर्षांनी आरसीबीने आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकले. यानंतर बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्टेडियम बाहेर हजारो चाहत्यांची गर्दी झाली. चेंगराचेंगरीत ११ जणांचा चिरडून मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. पोलिसांनी आरसीबी, केएससीए आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला असून तपास सीआयडीकडे सोपवला आहे.