Ravindra Jadeja CSK:
अनेक महिन्यांपासून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार असल्याची चर्चा सुरू आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या ट्रेड डीलबाबत सातत्यानं चर्चा होत आहे. संजू सॅमसनला चेन्नईकडून खेळवण्यासाठी काही महत्वाच्या खेळाडूंचे ट्रेड होऊ शकते. संजू जर सीएसकेकडे खेळणार असेल तर सीएसकेचा रविंद्र जडेजा आणि त्याच्या सोबत सॅम करन किंवा मथीशा पथिराना हे राजस्थान रॉयल्स कडून खेळणार असण्याची शक्यता आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी ट्रेड डील जवळपास फायनल झाली आहे. आयपीएल २०२६ ची रिटेंशन डेडलाईन ही १५ नोव्हेंबर आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजस्थानला संजू सॅमसनच्या बदल्यात रविंद्र जडेजा आणि सॅम करनची मागणी केली होती. मात्र आता या चर्चेत आरआरकडून श्रीलंकेच्या मथीशा पथिरानाची मागणी पुढे केली जात आहे. राजस्थान संजू सॅमसनच्या ट्रेड डीलमधून जास्तीजास्त पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहे.
सॅमसन हा राजस्थानचे जवळपास दशकभरापेक्षा नेतृत्व करत आहे. त्यानं २०२५ च्या हंगामानंतर फ्रेंचायजी सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. सीएसके आणि संजू सॅमसन यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. प्राथमिक चर्चेमध्ये संजू सॅमसनकडे महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून पाहिलं जात आहे.
जर सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील ही डील फायनल झाली तर सीएसकेचा अनेक काळापासूनचा खेळाडू रविंद्र जडेजा आपली जुनी अन् पहिली फ्रेंचायजी राजस्थान रॉयल्सकडून पुन्हा खेळण्याची शक्यता आहे. मात्र राजस्थाननं जडेजासोबत अजून एका खेळाडूची मागणी केल्यामुळं या चर्चाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. सुरूवातीला मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्सने डेवाल्ड ब्रेविसची मागणी केली होती. मात्र आता फ्रेंचायजीनं सॅम करन किंवा मथीशा पथिरानावर फोकस केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीएसके हा पथिरानाला सोडून देण्यास तयार नाही. त्यामुळं दोन्हीकडून अनेक पर्याय ठेवले जात आहेत. विशेष म्हणजे जडेजानं या ट्रेडसाठी आपली सहमती दर्शवली आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी धोनी, ऋतुराज गायकवाड आणि स्टिफन फ्लेमिंग यांच्यात दीर्घ चर्चा झाली होती.
जर हा ट्रेड व्यवस्थित पार पडला तर दोन्ही फ्रेंचायजी एका मोठ्या बदलातून जातील. राजस्थान हा त्यांच्या दीर्घकाळाच्या कर्णधाराला गमावेल. मात्र त्याच्या बदल्यात दोन जागतिक दर्जाचे खेळाडू आपल्या पदरात पाडून घेतील. त्यामुळं त्यांचं फिरकी डिपार्टमेंट आणि वेगवान गोलंदाजीचं डिपार्टमेंट सक्षम होणार आहे. जर पथिराना राजस्थान रॉयल्सच्या पदरात पडला तर त्यांची डेथ बॉलिंग स्ट्राँग हणार आहे.
दुसरीकडं सीएसकेला टॉप ऑर्डरमध्ये एक धडाकेबाज फलंदाज मिळाले. त्याचबरोबर धोनीच्या कॅप्टन आणि विकेटकिपर म्हणून उत्तराधिकाऱ्यासाठी देखील अजून एक ऑप्शन मिळेल. जर सॅमसन आणि धोनी एकाच संघात असतील तर चेन्नई आणि केरळच्या फॅन्ससाठी ते सोन्याहून पिपळं ठरेल.
सॅमसन आणि जडेजा या दोघांची व्हॅल्युएशन ही १८ कोटी रूपये आहे. जर सॅम करनचा यात समावेश झाला आरआरला २.४ कोटी अधिकचे द्यावे लागतील. मात्र जर पथिरानाचा विचार केला तर त्याला २०२५ मध्ये १३ कोटी रूपये मिळाले होते. राजस्थानला संजू सॅमसन गमावण्यासोबतच पर्समधील १३ कोटी रूपये देखील द्यावे लागतील. या सर्व ट्रेडला आयपीएल गव्हर्निंग काऊन्सीलची परवानगी लागते. त्यासाठी खेळाडूंकडून लेखी सहमती आवश्यक असते. या गोष्टी झाल्यानंतर अधिकृत पेपर वर्क सुरू होईल.