Ravichandran Ashwin on Hardik Pandya
मुंबई इंडियन्सच्या (MI) आयपीएल २०२६ मधील निराशाजनक कामगिरीसाठी केवळ कर्णधार हार्दिक पांड्यालाच जबाबदार धरणे पूर्णपणे अयोग्य आहे, अशा शब्दांत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने हार्दिकची जोरदार पाठराखण केली आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सचा यंदाचा प्रवास अत्यंत निराशाजनक राहिला. १२ सामन्यांतून केवळ ४ विजय मिळवून प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा मुंबई हा यंदाच्या हंगामातील दुसरा संघ ठरला. त्यातच हार्दिक पांड्याला फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्हीने चमक दाखवता आलेली नाही. त्याच्या नेतृत्वावर सातत्याने टीका होत आहे.
ESPNcricinfo शी बोलताना अश्विन म्हणाला, "मी यंदाच्या हंगामात त्याच्या नेतृत्वाचे अजिबात पुनरावलोकन करणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर, जेव्हा तुमचा असा खराब हंगाम जातो, तेव्हा त्याचे संपूर्ण खापर कर्णधारावर फोडणे चुकीचे आहे. केवळ तोच नाही, तर संपूर्ण संघच यंदा फ्लॉप ठरला आहे."
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर बोलताना अश्विनने गुजरात टायटन्सच्या (GT) यशाचा दाखला दिला. हार्दिकने गुजरातला पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते आणि दुसऱ्या हंगामात संघ उपविजेता ठरला होता. तो गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. तिथे त्याचे दोन हंगाम उत्कृष्ट राहिले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, एक कर्णधार म्हणून त्याने तिथे काहीतरी नक्कीच चांगले केले होते."
रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणे हार्दिकसाठी कधीच सोपे नव्हते, असेही अश्विनने मान्य केले. "रोहित शर्मासारख्या भारताच्या सध्याच्या मर्यादित षटकांच्या कर्णधाराची जागा घेणे सोपे काम नाही. ज्याच्या नावावर आयपीएलची ५ विजेतेपदे आणि टी२० विश्वचषक आहे, त्याची जागा घेणे कठीणच आहे. देशात त्याची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे. आजकाल सोशल मीडियावरील टीकेला तोंड देण्यासाठी तुमची क्षमता असावी लागते.
हार्दिकच्या फलंदाजीवर बोलताना अश्विनने त्याच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली. हार्दिक चेंडू खेळताना उशिरा (Late) खेळत असून, यामागे काही शारीरिक दुखापत असण्याची शक्यता त्याने वर्तवली. त्याच्या फलंदाजीत मला एक गोष्ट खूप विचित्र आणि रंजक जाणवली, ती म्हणजे तो चेंडू खूप उशिरा खेळत आहे. त्याला काही शारीरिक त्रास होत आहे का? हे आपल्याला ठाऊक नाही. पण 'हार्ड लेंथ'वर येणाऱ्या चेंडूंना खेळताना तो थकत असल्याचे दिसतोय. दरम्यान, हार्दिक पांड्याने यंदाच्या हंगामात ८ डावांत केवळ १४६ धावा केल्या आहेत, तर ११.९० च्या महागड्या इकॉनॉमी रेटने फक्त ४ विकेट्स घेतल्या आहेत. पाठीच्या त्रासामुळे तो यंदाचे तीन सामने खेळू शकला नाही.
हार्दिक हा संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असल्याचे अश्विनने आवर्जून सांगितले. "हार्दिक हा 'वन्स-इन-अ-जनरेशन' (पिढीतून एकदाच मिळणारा) खेळाडू आहे. असे खेळाडू सहजासहजी मिळत नाहीत. भारतीय संघ जर आज टी२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असेल, तर हार्दिक त्याचा मुख्य कणा आहे," असे अश्विनने स्पष्ट केले.