Ravi Shastri on Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा नामुष्कीजनक पराभव झाला. यानंतर सर्वच स्तरातून भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीकेची झोड उठली. यामध्ये टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समावेश होता. मात्र आता आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकल्यानंतर शास्त्री यांनी गंभीर यांची पाठराखण केली आहे.
वन-डे फॉरमॅटमध्ये गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये गंभीर यांना अजूनही संघाला स्थिरता मिळवून देता आलेली नाही. त्यांच्या कोचिंग कार्यकाळात भारतीय संघाने २ कसोटी मालिका जिंकल्या आहेत, ३ हरल्या आहेत आणि १ ड्रॉ राहिली आहे. भारतीय संघाने जवळपास एका वर्षात दोनदा आपल्याच मायभूमीवर कसोटी मालिका गमावली आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारतीय संघाचा ३-० ने धुव्वा उडवला होता. एका पॉडकास्टवर बोलताना शास्त्री म्हणाले की, संघ हरल्यावर नेहमी प्रशिक्षकालाच लक्ष्य केले जाते. ते स्वतः जर प्रशिक्षक असते, तर पराभवाची जबाबदारी घेतली असती.संघाच्या पराभवासाठी एकाच व्यक्तीला जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले.
रवी शास्त्री म्हणाले, 'लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की खेळाडूंनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तुम्ही एकाच व्यक्तीला लक्ष्य करू नये. माझ्यासोबत असे झाले आहे, त्यामुळे मी माझा अनुभव सांगत आहे. जेव्हा असे काही होते, तेव्हा खेळाडूंनीही आपली चूक मान्य केली पाहिजे. खेळाडूंमध्ये ही भावना असायला हवी की आम्ही पराभव स्वीकारला आहे आणि यातून आम्ही उत्कृष्ट बनू. जोपर्यंत असे होणार नाही, तोपर्यंत गोष्टी पुढे सरकणार नाहीत.'
रवी शास्त्री यांनी गौतम गंभीर यांना इशारादेखील दिला. ते म्हणाले, 'जर कामगिरी खराब राहिली, तर तुम्हाला हटवलेही जाऊ शकते. त्यामुळे संयम (धैर्य) महत्त्वाचा आहे. खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी संवाद आणि मनुष्यबळ व्यवस्थापन (मॅन-मॅनेजमेंट) या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दरम्यान, आता वनडे मालिकेतील विजयानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. टी२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकच्या बाराबती स्टेडियमवर होणार आहे.