Ravi Shastri England Coach: इंग्लंडचा अवघ्या ११ दिवसात अॅशेस मालिकेत पराभव झाल्यानंतर संघ व्यवस्थापनात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण जाली आहे. इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम हे सध्या रडारवर असून त्यांच्या कामगिरीचे युद्धपाकळीवर मुल्यमापन होत आहे.
मॅक्युलमच्या बॅझबॉल रणनितीवर आता शंका घेतली जाऊ लागली असून त्याचे इंग्लंड संघासोबतचे भविष्य आता अधांतरी झालं आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज माँटी पनेसरने इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रींचे नाव सुचवून एका वेगळ्याच चर्चेला तोंड फोडलं आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने २०२२ मध्ये ब्रँडन मॅक्युलमची इंग्लंच्या कसोटी संघाचा हेड कोच म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यानं बॅझबॉल म्हणजे अत्यंत आक्रमक क्रिकेट खेळण्याची रणनिती अवलंबली. सुरूवातीच्या काळात इंग्लडने या रणनितीच्या आधारे दैदिप्यमान यश मिळवलं. त्यांनी त्या काळात ११ पैकी १० सामन्यात विजय मिळवला.
मात्र आता इंग्लंड संघाची दिवसेंदिवस कामगिरी खालावत चालली आहे. त्यांना ऑस्ट्रेलिया किंवा भारताविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत यश मिळवता आलेलं नाही. त्यांनी ३३ पैकी १६ सामने गमावले आहेत. सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेचा देखील यात समावेश आहे. ते सध्या मालिकेत ०-३ ने पिछाडीवर आहेत. मालिकेतील अजून दोन सामने शिल्लक आहेत.
दरम्यान, इंग्लंडचा माजी खेळाडू पनेसरने पत्रकार रवी बिश्त यांच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी बोलताना पनेसरने इंग्लंडचा प्रशिक्षक म्हणून त्याला रवी शास्त्री योग्य वाटतात. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्यासाठी काय करावं लागेल हे त्यांना चांगलं माहिती आहे.
पनेसर म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियाला कसं हरवायचं हे कोणाला नेमकं माहिती आहे याचा तुम्हाला विचार करावा लागले. ऑस्ट्रेलियाच्या कच्च्या दुव्यांचा कशा प्रकारे फायदा उचलायचा हे माहिती हवं. मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि रणनैतिकदृष्ट्या हे कसं करायचं हे माहिती हवं. मला वाटतं रवी शास्त्री हे इंग्लंडचे पुढचे कोच होण्यासाठी अत्यंत योग्य व्यक्ती आहेत.'
रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत दोनवेळा पराभूत केलं आहे. पहिल्यांदा २०१८-१९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. त्यानंतर २०२० - २१ मध्ये तोच कित्ता गिरवला.
दरम्यान, बाहेर मॅक्युलमच्या भविष्याबाबत काहीही चर्चा सुरू असली तरी त्याने इंग्लंडचा कोच म्हणून काम करत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अॅशेस मालिकेनंतर त्याच्या भविष्याबाबत काहीही शाश्वती नसल्याचे जाणकारांचे मत आहे.