Ravi Shastri On Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह हा भारताचा एक महत्वाचा वेगवान गोलंदाज आहे. ३१ वर्षाच्या बुमराहनं भारताला अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. बुमराह हा तीनही फॉरमॅटचा उत्तम गोलंदाज आहे. संघाला अवघड परिस्थितीतून बाहेर काढून विजय मिळवून देण्यात त्याचा हातखंडा आहे.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून जसप्रीत बुमराहची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. सध्या त्याच्या वर्कलोडची चर्चा खूप होत आहे. बुमराह हा इंग्लंडमधील अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफीमध्ये फक्त तीन कसोटी सामने खेळला.
दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जसप्रीत बुमराहच्या निवडीबाबत आणि वर्कलोडबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षरित्या निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकरवर निशाणा साधाला. त्यांनी बुमराहचा योग्य वापर करून घ्यायला अक्कल हवी असं वक्तव्य केलं.
रवी शास्त्री प्रभात खबरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, 'बुमराह हा दादा बॉलर आहे. बुमराहला संघात घ्यायला अक्कल लागते. तुम्ही त्याला मर्यादित षटकांचा गोलंदाज करून टाकलं आहे. त्यामुळं तो आता कसोटीचा गोलंदाज कसा होणार?'
शास्त्री ते प्रशिक्षक असताना जसप्रीत बुमराहला त्यांनी कसोटीमध्ये कसं योग्य प्रकारे वापरून घेतलं हे सांगायला देखील विसरले नाहीत. बुमराहचे कसोटी पदार्पण होण्यापूर्वी अनेक क्रिकेट पंडित आणि मुंबई इंडियन्सचे चाहते बुमराह हा फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी योग्य आहे असं म्हणत होते. त्याची अॅक्शन अशी आहे की तो कसोटी क्रिकेटमध्ये टिकाणार नाही. मात्र बुमराहनं सर्वांना खोटं ठरवलं.
या वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत ५ सामने खेळल्यावर जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकला होता. त्याचबरोबर आयपीएलचे सुरूवातीचे काही सामने देखील त्याला खेळता आले नाहीत. त्यानंतर बुमराहच्या बाबतीत सध्याचे संघ व्यवस्थापन हे अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलत आहे.
जसप्रीत बुमराहच्या या दुखापतीच्या भीतीमुळे संघ व्यवस्थापनानं आधीच बुमराह हा इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत फक्त ३ सामने खेळले हे ठरवून टाकलं होतं. त्यामुळे बुमराहला टीकेचा धनी देखील व्हाव लागलं.
इंग्लंड मालिकेनंतर बुमराह हा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सर्व वनडे मालिकेसाठी उपलब्ध आहे. त्यापूर्वी बुमराह हा वेस्ट इंडीज आणि दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेतील सर्व सामने देखील खेळला. आता तो दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या टी २० मालिकेसाठी देखील उपलब्ध असणार आहे.