FIFA World Cup 2026 Rajit Dev choreography Siir Siir Nora Fatehi Instagram
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक २०२६ च्या अधिकृत अल्बमची कोरिओग्राफी करणारे रजित देव ठरले पहिले भारतीय

कोरिओग्राफर रजित देव हे फिफा विश्वचषक २०२६ च्या अधिकृत अल्बमचे कोरिओग्राफी करणारे पहिले भारतीय कोरिओग्राफर ठरले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

FIFA World Cup 2026 Rajit Dev choreography Siir Siir Nora Fatehi

मुंबई: मुंबईत वाढलेले आणि मूळचे केरळचे असलेले प्रसिद्ध कोरिओग्राफर रजित देव यांनी भारतीय मनोरंजन विश्वासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. फिफा विश्वचषक २०२६ च्या अधिकृत अल्बमचे कोरिओग्राफी करणारे ते पहिले भारतीय कोरिओग्राफर ठरले आहेत. त्यांनी अल्बममधील ‘सीर सीर’ या गाण्याची कोरिओग्राफी केली असून, या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही झळकली आहे.

‘सीर सीर’ हे गाणे मोरोक्कोच्या लोकप्रिय फुटबॉल घोषणेवर आधारित असून त्याचा अर्थ ‘पुढे चला’ असा होतो. फ्रेंच गायक-गीतकार वेझीड्रीम आणि संगीत निर्माता संजाय यांनी या गाण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ फिफाच्या विशेष संगीत प्रकल्पाचा भाग असून त्यात जगभरातील अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले आहेत.

फिफाच्या अधिकृत अल्बममध्ये १८ गाणी

रजित देव यांनी सांगितले की, फिफा विश्वचषक २०२६ च्या अधिकृत अल्बममध्ये एकूण १८ गाणी आहेत आणि त्यापैकी ‘सीर सीर’ या गाण्याची कोरिओग्राफी करण्याची संधी त्यांना मिळाली. नोरा हिनेच हे गाणे गायले आहे. नोरा भारतात आली तेव्हापासून मी तिला ओळखतो; आमची भेट 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोदरम्यान झाली होती. मी गेल्या १० वर्षांपासून नोरा फतेहीसोबत काम करत आहे."

नोराला हे गाणे लगेचच आवडले

रजित देव यांनी सांगितले की, फिफासाठी गाणे तयार करण्याची संधी मिळाल्यानंतर नोरा फतेहीने कोरिओग्राफीची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. “या प्रवासाची सुरुवात तिथूनच झाली. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात नृत्य करणारे सर्व कलाकार भारतातील आहेत आणि ते माझ्या डान्स टीमचा भाग आहेत,” असे त्यांनी सांगितले.

मोरोक्कोमध्ये झाले शूटींग

या गाण्याचे शूटींग मोरोक्कोमध्ये करण्यात आले. मुंबईत दोन दिवस सराव केल्यानंतर संपूर्ण टीम मोरोक्कोला रवाना झाली. त्यावेळी नोरा विविध कामांमुळे प्रवासात असल्याने ती थेट मोरोक्कोमध्येच टीमला भेटली. कोरिओग्राफीचा व्हिडीओ तिला आधी पाठवण्यात आला होता. सुरुवातीला नृत्याच्या अवघड स्टेप्स पाहून तिने थोडी चिंता व्यक्त केली होती, मात्र नंतर ती पूर्ण तयारीनिशी सरावासाठी उतरली.

फक्त १५ मिनिटांत स्टेडियममधील शूटिंग पूर्ण

गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. रबात येथील एका मोठ्या स्टेडियममध्ये शूटिंगसाठी टीमला केवळ १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. याच स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि मोठे सामने खेळले जातात. “गाण्याचा महत्त्वाचा भाग आम्हाला स्टेडियममध्ये शूट करायचा होता. त्यामुळे आत जाण्यापूर्वी आम्ही अनेक वेळा सराव केला. स्टेडियममध्ये प्रवेश मिळाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत आम्ही नियोजनाप्रमाणे संपूर्ण दृश्ये चित्रीत केली. आता जेव्हा आम्ही ते गाणे पाहतो, तेव्हा त्यातील दृश्ये अतिशय नेत्रदीपक वाटतात,” असे रजित देव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT