Rajat Patidar SMAT 2026: आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने ओळख निर्माण करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार रजत पाटीदार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये खेळताना पाटीदारने अवघ्या 48 चेंडूंत नाबाद 135 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे मध्य प्रदेशच्या संघाने मोठी धावसंख्या उभारली.
2026 च्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश आणि आसाम यांच्यात सामना खेळण्यात आला. न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे झालेल्या या सामन्यात रजत पाटीदारने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात प्रवेश केला. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक फलंदाजी केली. आसामच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्याने चौकार आणि षटकारांची अक्षरशः बरसात केली.
पाटीदारने अवघ्या 41 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याची फटकेबाजी सुरूच राहिली. त्याने 48 चेंडूंत 8 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने नाबाद 135 धावा केल्या. या खेळीसह त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून शतक झळकावणारा पहिला फलंदाज होण्याचा विक्रम केला.
या सामन्यात मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 250 धावांचा डोंगर उभा केला. रजत पाटीदारशिवाय शिवांग कुमारनेही दमदार फलंदाजी केली. त्याने 61 धावांचे योगदान दिले. अक्षत रघुवंशीने 19, अंकुश सिंहने 23, अपूर्वे द्विवेदीने 3, त्रिपुरेश सिंहने शून्य, तर अनिकेत वर्माने 1 धाव केली.
रजत पाटीदारच्या या वादळी खेळीमुळे मध्य प्रदेशने आसामसमोर मोठे आव्हान उभे केले. आयपीएलमधील आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक पाटीदारने पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दाखवून दिली आहे.