R Praggnanandhaa file photo
स्पोर्ट्स

R Praggnanandhaa: आर. प्रज्ञानंदने इतिहास रचला; नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला

Norway Chess 2026:

मोहन कारंडे

R Praggnanandhaa Norway Chess 2026

ओस्लो : भारताचा युवा बुद्धीबळपट्टू आर. प्रज्ञानानंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी करत प्रतिष्ठेचे नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद पटकावले. ओस्लो येथे शुक्रवारी झालेल्या अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमर याच्यावर अंतिम फेरीत विजय मिळवत प्रज्ञानानंदने हा मान मिळवला. या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

अंतिम फेरीपूर्वी 20 वर्षीय प्रज्ञानानंद 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र निर्णायक क्षणी त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कीमरचा पराभव केला आणि तीन पूर्ण गुण मिळवत एकूण 18 गुणांसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आणि भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले.

2013 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय बुद्धिबळातील दिग्गज विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेश यांनाही जे साध्य करता आले नव्हते, ते प्रज्ञानानंदने करून दाखवले. नॉर्वे चेसमध्ये तो दुसऱ्यांदा सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याने जगातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याला क्लासिकल प्रकारात दोनदा पराभूत करण्याची दुर्मिळ कामगिरीही केली.

‘आईने आधीच सांगितले होते...’

विजेतेपदानंतर प्रज्ञानानंदाने आपल्या यशाचे श्रेय आईच्या प्रेरणेला दिले. तो म्हणाला, “1 जून रोजी अलिरेझाविरुद्धच्या सामन्यापूर्वी माझे आईशी बोलणे झाले होते. तिने मला सांगितले होते, ‘नवा महिना सुरू झाला आहे, तू चांगला खेळशील.’ आई नेहमीच असे म्हणते. त्यानंतर मी सलग चार सामने जिंकलो. कदाचित तिला काहीतरी जाणवत होते.”

कार्लसनकडूनही कौतुक

दरम्यान, स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या कार्लसनने अखेरच्या फेरीत डी. गुकेशचा पराभव करून चौथे स्थान मिळवले. प्रज्ञानानंदाच्या विजेतेपदाबाबत प्रतिक्रिया देताना कार्लसन म्हणाला, “हे खरोखरच अविश्वसनीय आहे. निर्णायक क्षणी त्याने सर्वोत्तम खेळ केला. अशा शेवटामुळे मलाही विजेतेपदाची संधी होती, पण त्याने जे साध्य केले ते अद्भुत आहे. तो एक जबरदस्त लढवय्या आहे आणि त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळताना पाहणे आनंददायी आहे.”

शेवटच्या डावात केली कमाल

अंतिम फेरीत प्रज्ञानानंद आणि कीमर यांच्यात चुरशीची लढत झाली. बराच काळ सामना समसमान राहिला, मात्र शेवटी कीमरची एकाग्रता ढासळली आणि त्याचा फायदा घेत प्रज्ञानानंदने विजय मिळवला. या विजयामुळे प्रज्ञानानंदचा एलो रेटिंग पुन्हा एकदा 2750 च्या पुढे गेला. तसेच कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात आलेल्या अपयशाची निराशाही त्याने मागे टाकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT