Pudhari news
स्पोर्ट्स

Samson Vs Vaibhav : वैभव सूर्यवंशीला बाहेर बसविण्‍यासाठीच संजूची 'खेळी' : आर. अश्विनचं मोठं विधान

संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात सलामीच्या एका जागेसाठी चुरस पाहायला मिळत आहे

पुढारी वृत्तसेवा

R Ashwin on Vaibhav Sooryavanshi : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. रविवारी इंदूरमध्ये झालेला तिसरा सामना भारताने १४ धावांनी जिंकला. या मालिकेत युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीला अद्याप एकदाही प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. अश्विनने या संपूर्ण परिस्थितीवर परखड भाष्य केलं आहे.

संजू सध्या ज्या प्रकारे सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे....

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीवरच संघ व्यवस्थापनाचा भर कायम आहे. ३१ वर्षीय संजूने दुसऱ्या सामन्यात ४१ चेंडूंमध्ये ८२ धावांची तुफानी खेळी केली होती, मात्र इंदूरमध्ये त्याला केवळ ३ धावा करता आल्या. संजू आणि १५ वर्षीय वैभव यांच्यात सलामीच्या एका जागेसाठी चुरस पाहायला मिळत आहे. संजू सध्या ज्या प्रकारे सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, त्यामुळेच वैभवला बाहेर बसावं लागत आहे, असं भारताचा माजी दिग्गज गोलंदाज आर. अश्विनने म्हटलंय.

'आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात...'

सोमवारी आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये अश्विन म्हणाला, ''मला वाटतं, संजू सध्या ज्या लेव्हलवर खेळतोय, ती कामगिरी वैभवला प्लेइंग इलेव्हनबाहेर ठेवण्यासाठी पुरेशी आहे. हे दुर्दैवी नक्कीच आहे, कारण वैभवलाही संधी मिळायला हवी. पण काय करणार? आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. या दोघांमधील ही स्पर्धा रंगण्याचं मुख्य कारण म्हणजे, दुसरा ओपनर अभिषेक शर्माला वगण्याचा विचार संघ व्यवस्थापन किंवा कुणीही स्वप्नातही करू शकत नाही, हे सर्वांना ठाऊक आहे.

अभिषेक एक अप्रतिम खेळाडू

अभिषेक हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. त्याचा फॉर्म सुफळ असेल, तर तो एकटाच भारताला सामना जिंकवून देऊ शकतो. तो जसजसा खेळेल, तसतसा अधिक परिपक्व होत जाईल. गेल्या दोन-तीन महिन्यांत कठीण आणि आव्हानात्मक खेळपट्ट्यांवरही त्याने ज्या प्रकारे धावा केल्या आहेत, ती माझ्या मते सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्याचा आलेख सातत्याने उंचावत चाललाय. अभिषेक एक अप्रतिम खेळाडू आहे, त्याला मैदानात फटकेबाजी करताना पाहणं हा एक वेगळाच आनंद असतो.''

'गेल्या दोन महिन्यांत अभिषेकने परिस्थितीनुसार खेळ उंचावलाय'

अभिषेक शर्माने गेल्या काही महिन्यांत कशा पद्धतीने परिस्थितीनुसार स्वतःच्या खेळाला आकार दिलाय, हे कौतुकास्पद आहे. याआधीही कठीण खेळपट्ट्यांवर त्याने ज्या परिपक्वतेने फलंदाजी केली, ती त्याची क्षमता सिद्ध करते. इंदूरची खेळपट्‍टी इतकी सोपी नव्हती, पण तिथेही त्याने ताकदीने खेळ करून दाखवला.'' अभिषेकने आतापर्यंत ६५ टी-२० सामन्यांत ३२.८३ च्या सरासरीने आणि १९५.९५ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने २०२६ धावा केल्या आहेत, असेही अश्‍विनने म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT