Commonwealth Games 2026: ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये शनिवारी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर प्रीती पवारने ५४ किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
अंतिम सामन्यात २२ वर्षीय प्रीतीने सामन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत संयमी आणि वर्चस्वपूर्ण खेळ केला. कॅनडाच्या प्रतिस्पर्धी बॉक्सरला सामन्यात पुनरागमन करण्याची कसलीही संधी न देता प्रीतीने ५-० अशा एकतर्फी फरकाने बाजी मारली. संपूर्ण सामन्यात आपले वर्चस्व कायम ठेवत राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मधील बॉक्सिंग (मुष्टियुद्ध) प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक निश्चित केले
पहिल्याच फेरीत प्रीतीने लढतीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. तिने अचूक आणि सनसनाटी पंचेस मारत सामन्याचा वेग स्वतःच्या हातात ठेवला. पाचही पंचांनी (Judges) ही फेरी प्रीतीच्या बाजूने १०-८ अशी गुणंकित केली. दुसऱ्या फेरीतही हाच फॉर्म कायम ठेवत, बँकॉक (बँटमवेट) ५४ किलो वजन गटातील जागतिक क्रमवारीतील 'नंबर ३' असणार्या प्रीतीने भक्कम बचावासह आत्मविश्वासाने प्रहार करणे सुरूच ठेवले.
भारतीय मुष्टियुद्धपटू प्रीती या संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसली. पहिल्या फेरीत स्कॉटलंडच्या निआम्ह ह्युस्टनवर दणदणीत विजय मिळवून तिने आपल्या राष्ट्रकूलमधील सुवर्णपदकाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या टीना राहिमीचा पराभव करत तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत प्रीतीने आणखी एक जबरदस्त कामगिरी करताना झांबियाच्या कॅथरीन म्वापेचा ५-० असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.या संपूर्ण स्पर्धेत एकही फेरी (Bout) न गमावता अंतिम फेरीत पोहोचलेल्या प्रीतीचा आत्मविश्वास उंचावला होता आणि तिने चाहत्यांच्या अपेक्षा तंतोतंत खर्या करून दाखवल्या. तिचा आक्रमक खेळ, चपळ 'फूटवर्क' आणि अचूक पंचेस पुढे कॅनडाची डेलगाडो पूर्णपणे हतबल झाली. प्रीतीच्या आक्रमकतेचा सामना करणे तिला कठीण गेले.
हे सुवर्णपदक म्हणजे भारतातील अव्वल बॉक्सर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रीतीच्या शिरपेचात रोवलेला आणखी एक मानाचा तुरा आहे. बँटमवेट गटात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रीतीने आंतरराष्ट्रीय मंचावर आपण सर्वोत्तम दावेदार का आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
प्रीती पवारने गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरीची मालिकाच लावली आहे. तिने २०२६ च्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि २०२५ च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्येही सुवर्णपदक पटकावले होते.याआधी तिने २०२३ च्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games) कांस्यपदक जिंकले होते आणि २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिने २०२२ च्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, तर कझाकस्तान येथे झालेल्या २०२४ च्या ASBC आशियाई U-22 आणि यूथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.