T20 World Cup Pat Cummins Hat Trick
टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने अफगाणिस्तानविरुद्ध ‘हॅटट्रिक’ घेतली. Image Twitter
स्पोर्ट्स

T20 World Cup : कमिन्सने रचला इतिहास! सलग दुसऱ्या सामन्यात घेतली ‘हॅटट्रिक’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pat Cummins : टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने अनोखा विक्रम रचला. त्याने सलग दुस-या सामन्यात एकापाठोपाठ एक तीन विकेट घेऊन ऐतिहासिक हॅटट्रिक साधली. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. रविवारी (दि. 23) सुपर 8 फेरीतील अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात कमिन्सने ही किमया केली. कमिन्सने याआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक पूर्ण केली होती. तो आता स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत पोहचला आहे.

कमिन्सचा अनोखा विक्रम

  • पॅट कमिन्सने अफगाणिस्ताविरुद्ध हॅटट्रिक घेत अनोखा विक्रम रचला.

  • त्याने याआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक पूर्ण केली होती.

  • सलग दोन सामन्यात हॅटट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला.

कमिन्सने 18 व्या षटकातील सहाव्या चेंडूवर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान (2) याला बाद करून पहिले यश मिळवले. त्यानंतर त्याने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर करीम जनात (13) याला माघारी धाडले, तर पुढच्याच चेंडूवर गुलबदिन नायब (0) याला पॅव्हेलियनमध्ये पाठवून हॅट्ट्रीक पूर्ण केली. कमिन्सने चार षटकांत 28 धावा देऊन तीन बळी घेतले. त्यांच्याशिवाय ॲडम झाम्पाने दोन आणि मार्कस स्टॉइनिसने एक विकेट घेतली.

सलग दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक घेणारा कमिन्स हा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. कमिन्स व्यतिरिक्त, फक्त लसिथ मलिंगा आणि टीम साउदी यांनी कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेतली आहे. कमिन्सने या विश्वचषकात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत आणि 4 डावात 10.66 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या आहेत.

टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज

ब्रेट ली : विरुद्ध बांगलादेश (2007)

कुर्तिस कॅम्फर : विरुद्ध नेदरलँड्स (2021)

वानिंदू हसरंगा : विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2021)

कागिसो रबाडा : विरुद्ध इंग्लंड (2021)

कार्तिक मयप्पन : विरुद्ध श्रीलंका (2022)

जोशुआ लिटल : विरुद्ध न्यूझीलंड (2022)

पॅट कमिन्स : विरुद्ध बांगलादेश (2024)

पॅट कमिन्स : विरुद्ध अफगाणिस्तान (2024)

कमिन्स दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज

कमिन्सच्या आधी, फक्त ब्रेट लीने दोनदा (2003 एकदिवसीय विश्वचषक आणि 2007 टी-20 विश्वचषक) अशी कामगिरी केली होती.

कमिन्सची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी राहिली?

कमिन्सने 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने आतापर्यंत 56 सामने खेळले आहेत. कमिन्सने आपल्या 56 डावांमध्ये 22.84 च्या सरासरीने आणि 7.35 च्या इकॉनॉमी रेटने 66 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 15 धावांत 3 विकेट अशी आहे. या खेळाडूने टी-20 विश्वचषकात 21 सामने खेळले असून 26.17 च्या सरासरीने आणि 7.62 च्या इकॉनॉमीने 23 विकेट्स घेतल्या आहेत.

SCROLL FOR NEXT