पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. दोन वेळा विश्वविजेती भारताची स्टार बॉक्सर निखत झरीनला महिलांच्या ५० किलो गटाच्या १६ व्या फेरीत चीनच्या यू वूने ५-० ने पराभूत केले.
निखत झरीनने रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार सुरुवात केली होती. झरीनने महिलांच्या ५० किलो वजनी गटात जर्मनीच्या मॅक्सी करिना क्लोत्झरवर विजय मिळवत ऑलिम्पिकच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली होती. आज प्री-क्वार्टर फायनलमध्ये निखतसमोर चीनच्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि फ्लायवेट वर्ल्ड चॅम्पियन वू यूचे आव्हान होते. तिला वू यूने ५-० ने पराभूत केले.
निखत झरीनने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक आणि २०२२ आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये ती वर्ल्ड चॅम्पियन राहिली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या दावेदारांमध्ये निखत झरीनचा समावेश होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत मिळाली आहेत. स्वप्नील कुसाळे याने आज ५० मीटर रायफल स्पर्धेत ब्रॉन्झ पदकाला गवसणी घातली आहे. यापूर्वी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. त्याचवेळी सरबजोतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे.