स्पोर्ट्स

Pakistan controversy : भांडी घासा, मग मॅच खेळा.. पाकिस्तान खेळाडूंवर सामन्यापूर्वी लाजिरवाणी वेळ! कर्णधाराचा खळबळजनक खुलासा

Pakistan players wash dishes : मानसिक, शारीरिक त्रासानंतर दुसऱ्याच दिवशी खेळला सामना

रणजित गायकवाड

Pakistan Players Forced to Wash Dishes Before Match Claims Captain

लाहोर : पाकिस्तान हॉकी संघ सध्या मैदानावरील कामगिरीपेक्षा तेथील प्रशासकीय गोंधळामुळे अधिक चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना सामन्यापूर्वी चक्क भांडी घासावी लागल्याचा धक्कादायक खुलासा संघाचा कर्णधार शकील अम्माद बट याने केला आहे. मायदेशी परतल्यानंतर लाहोर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या (PHF) कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले.

मैदानाबाहेरही 'संघर्ष'

कर्णधार बट याने दावा केला की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंना अत्यंत मानहानीकारक परिस्थितीचा सामना करावा लागला. तो म्हणाला, ‘जेव्हा खेळाडूंना महत्त्वाच्या सामन्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करावे लागते आणि भांडी घासावी लागतात, तेव्हा तुम्ही चांगल्या निकालाची अपेक्षा कशी करू शकता? सध्याच्या व्यवस्थापनासोबत काम करणे आता अशक्य झाले आहे.’

हॉटेल बुकिंगचा गोंधळ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंना केवळ अपमानास्पद वागणूकच मिळाली नाही, तर निवासासाठीही वणवण करावी लागली. अधिकृत माहितीनुसार, पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डाने हॉटेल व्यवस्थेसाठी १ कोटी रुपयांहून अधिक निधी दिला होता. असे असतानाही खेळाडूंना सिडनी विमानतळावर १३-१४ तास ताटकळत राहावे लागले. एफआयएच (FIH) प्रो लीग सामन्यांसाठी हॉटेलवर पोहोचल्यावर समजले की, आगाऊ रक्कम न भरल्यामुळे बुकिंगच झालेले नाही.

परिणामी, खेळाडूंना कित्येक तास रस्त्यावरच भटकावे लागले. या मानसिक आणि शारीरिक त्रासानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला २-३ ने पराभव पत्करावा लागला.

बटच्या दाव्यानुसार, सुरुवातीला एअरबीएनबी (Airbnb) केवळ १० दिवसांसाठी बुक करण्यात आले होते, तर संघाचा मुक्काम १३ दिवसांचा होता. त्यानंतर खेळाडूंना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

प्रकरण थेट पंतप्रधानांच्या दरबारी

पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डाचे महासंचालक नूर उस सबाह यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल पंतप्रधान शहबाज शरीफ यांना सादर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान शरीफ हे पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे 'पॅट्रन-इन-चीफ' असल्याने त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, खेळाडूंना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याची तंबी देण्यात आली होती, असा आरोपही बटने केला आहे.

परदेशी प्रशिक्षकाची मागणी

पाकिस्तानला जागतिक हॉकीमध्ये पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचे असेल, तर परदेशी प्रशिक्षक आणि व्यावसायिक व्यवस्थापनाची गरज असल्याचे मत बटने व्यक्त केले. ‘संघात प्रतिभेची कमतरता नाही, पण दिशा आणि योग्य नियोजनाचा अभाव आहे,’ असे तो म्हणाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT