ठळक मुद्दे
विंडिजकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकचा माजी क्रिकेटपटू चिंतेत.
भारताने आशिया चषकात पाक विरुद्ध खेळण्यास नकार द्यावा
भारताकडून पराभूत झाल्यास संपूर्ण देशात निराशा पसरेल
ind vs pak asia cup former cricketer says team india should withdraw from tournament
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी आगामी आशिया चषक स्पर्धेत भारतासमोर पाकिस्तानच्या संभाव्य कामगिरीविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जर पाकिस्तानचा संघ भारताकडून पराभूत झाला, तर संपूर्ण देश निराश होईल, असे मत त्यांनी मांडले. इतकेच नव्हे, तर आशिया चषकात भारत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांच्यासह अनेक दिग्गजांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील दारुण पराभवानंतर आशिया चषकातील संघाच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली आहे. वेस्ट इंडिजने एकदिवसीय मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त कमबॅक करत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या विजयासह त्यांनी पाकिस्तान विरुद्धचा ३४ वर्षांचा पराभवाचा दुष्काळ संपवला.
वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या ODI सामन्यात २९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ९२ धावांवर गारद झाला. २०२ धावांनी झालेला हा पराभव पाकिस्तानच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा पराभव ठरला.
या पराभवानंतर 'द गेम प्लॅन' या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाले, ‘मी प्रार्थना करतो की, भारताने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार द्यावा, जसे त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये केले होते. भारतीय संघ इतक्या वाईट पद्धतीने पाकिस्तानचा पराभव करेल की, तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही.’
अफगाणिस्तानकडून पराभूत होण्याच्या शक्यतेवर बोलताना बासित अली पुढे म्हणाले, ‘जर पाकिस्तान अफगाणिस्तानकडून पराभूत झाला, तर या देशात कोणाला विशेष फरक पडणार नाही. पण ज्या क्षणी तुम्ही भारताकडून पराभूत होता, तेव्हा संपूर्ण देशात एकच खळबळ माजते.’
आशिया चषक स्पर्धेची सुरुवात ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणार आहे. यंदा ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार असून, पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग असेल. आशिया चषकाचे आयोजन यूएईमधील दुबई आणि अबुधाबी या दोन शहरांमध्ये केले जाणार आहे.