Pakistan Bangladesh T20 World Cup 2026: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा शेपटी घातली असून मोठा आर्थिक भूरदंड आणि बंदीची टांगती तलवार यामुळं भारताविरूद्धच्या सामन्यात बहिष्काराची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने पलटी मारली आहे. आता पाकिस्तान १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारतासोबतचा सामना खेळणार आहे. पाकिस्तान या दरम्यान जे काही करत होता ते पाहून पाकिस्तान खरोखरच बहिष्कार घालणार नव्हता. तो त्यांचा शेवटचा निर्णय नव्हता. त्यांनी फक्त त्याचा सौदेबाजीसाठी वापर केला.
भारताविरूद्ध कोणतंही कट कारस्थान थेट करण्याची हिंमत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नाही. त्यामुळे त्यांनी बांगलादेशचा खांदा वापरला. त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सहमती असल्याचं भासवलं. त्यांची ही विचारपूर्वक केलेली खेळी होती. त्यांनी बांगलादेशमार्फत आयसीसीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. भारतात आयोजित होत असलेल्या टी २० वर्ल्डकपला अडचणीत आणण्याचा त्यांचा मानस होता.
मात्र पाकिस्तानचे हे नाटक आयसीसी समोर फार काळ टिकलं नाही. आयसीसीने डोळे वटारताच पाकिस्ताननं शेपूट घातली. मात्र ज्या बांगलादेशची ढाल म्हणून वापर केला त्याचे मात्र मोठे नुकसान झाले.
पाकिस्ताननं या बहिष्काराच्या खेळात बांगलादेशला पुढं केलं. बांगलादेशनं सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिला. ऐनवेळी सामने हलवण्याचा हट्ट धरला. पाकिस्तानची फूस असल्यानं त्यांनी सर्व सीमारेषा ओलांडल्या. अखेर आयसीसीला कठोर निर्णय घेत बांगलादेशलाच टी २० वर्ल्डकपमधून वगळणे भाग पडले.
त्यानंतर पाकिस्ताननं आपण भारत - पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालणार अशी दुसरी टुम उठवली. यामुळं आयसीसी पर्यायानं भारताची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न केले गेला. मात्र आयसीसी पाकिस्तानवर कारवाई करणार असं चित्र निर्माण होताच त्यांनी पाय मागे खेचत आता आम्ही भारतासोबतचा सामना खेळणार असल्याचं सांगितलं. याचाच अर्थ की पाकिस्तानने आयसीसीवर दबाव निर्माण करण्यासाठी बांगलादेशचा वापर केला. मात्र ज्यावेळी स्वतःच्या बाबतीत निर्णयावर ठाम राहण्याची वेळ आली त्यावेळी आर्थिक नुकसान आणि मोठी कारवाईच्या भीतीनं माघार घेतली.
यामुळं पीसीबीने बांगलादेशसोबत खंबीरपणे उभे राहणे हे फक्त नाटक आहे. वापर करून झाला की बांगलादेशला वाऱ्यावर सोडून देऊ हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे दोन चेहरे स्पष्टपणे दिसतात. त्यांनी बांगलादेशला आता वाऱ्यावर सोडून दिलं आहे. आता बांगलादेशचं आयसीसीसोबत वाकडं झालंच आहे. भारतासोबतचेही क्रिकेट संबंध ताणले गेले आहेत. खेळाडूंचे आर्थिक नुकसान देखील झालं.
भारत आणि पाकिस्तान हे सामना आयसीसीच्या आर्थिक कमाईचा मोठा कणा आहे. या एका सामन्यावर प्रसारण हक्क, जाहिरात आणि जागतिक प्रेक्षक संख्या यांची गणिते अवलंबून असतात. जर या सामन्यालाच धक्का बसला तर आयसीसी हे सहन करणार नाही. या सर्वाचा आर्थिक भार थेट पाकिस्तानच्या खांद्यावर जाणार होता. त्याचबरोबर भविष्यात देखील पाकिस्तानची क्रिकेट वर्तुळात अवस्था बिकट झाली असती.
पीसीबीला वाटलं की हायब्रीड मॉडेल, विशेष राजकीय सहानभूतीद्वारे ते आयसीसीला वाकवू शकतात. मात्र आयसीसीने एका क्रिकेट बोर्डापेक्षा स्पर्धा ही मोठी आहे हे दाखवून दिलं. आयसीसीने आम्ही आमचे स्ट्रक्चर बदलणार नाही किंवा भारतावर कोणताही दबाव टाकणार नाही.
आयसीसीने कडक भूमिका घेतल्यामुळं पाकिस्तानला आता आपली डाळ शिजणार नाही असं जाणवल्यावर त्यांनी शेपूट घातली. त्यांनी आपल्या बहिष्काराच्या निर्णयापासून यू-टर्न घेतला. मात्र यामुळं पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पीसीबीने राजकारण करत एक वगेळाच संदेश क्रिकेट जगतात दिला. पाकिस्तान उघडा पडला.