pahalgam terror attack fancode stop pakistan super league live streming
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दल शोध मोहीम राबवत आहेत. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले असून शत्रू राष्ट्र पाकिस्तान विरुद्ध मोठे निर्णय घेतले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्वच पातळ्यांवर कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. ज्यामुळे शेजारच्या या शत्रू राष्ट्राची भांबेरी उडाली आहे. आता भारताकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीएसएल) ‘क्रिकेटिंग स्ट्राइक’ करण्यात आला आहे. खरंतर, क्रीडा प्रसारण प्लॅटफॉर्म फॅनकोडने पाकिस्तान सुपर लीग (PSL)चे स्ट्रीमिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 24 एप्रिल (गुरुवार) पासून ही कारवाई लागू केली जाणीर आहे. या निर्णयानंतर, पीएसएलच्या डिजिटल प्रेक्षकांच्या संख्येत मोठी घट होईल, ज्याचा थेट परिणाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या महसुलावर होणार आहे.
यासोबतच, क्रिकेट फॅन्टसी ॲप ड्रीम-11 ने देखील पाकिस्तान सुपर लीग 2025 बाबत मोठी कारवाई केली आहे. आता ड्रीम-11 वापरकर्ते पाकिस्तान सुपर लीग (PSL) सामन्यांसाठी या अॅपवर त्यांचा आवडता संघ तयार करू शकणार नाहीत. ड्रीम-11 ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून सर्व पीएसएल सामने काढून टाकले आहेत.
या वर्षी इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीग जवळजवळ एकाच वेळी आयोजित केले जात आहेत. पीएसएलच्या हंगामाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली. या स्पर्धेचा अंतिम सामना 18 मे रोजी खेळला जाईल. तर आयपीएल 22 मार्च रोजी सुरू झाली असोन विजेतेपदाचा सामना 25 मे रोजी खेळला जाणार आहे.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावानंतर पीएसएल ड्राफ्ट आयोजित करण्यात आला होता, जेणेकरून आयपीएल लिलावात न विकलेल्या खेळाडूंनाच समाविष्ट करता येईल. अशा परिस्थितीत डेव्हिड वॉर्नर, डॅरिल मिशेल, जेसन होल्डर, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन आणि केन विल्यमसन सारखे दिग्गज खेळाडू पीएसएलकडे वळले. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात हे खेळाडू अनसोल्ड राहिले होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. शत्रू देशाचा भारतातील दूतावासाला टाळे ठोकण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या राजदुतांसह त्यांच्या सर्व अधिका-यांना भारत सोडण्यसाठी फक्त 48 तासांचा कालावधी दिला गेला आहे. शिवाय, सिंधू पाणी करार रद्द करण्याची घोषणाही करण्यात आली आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये पाणी संकट निर्माण होऊ शकते. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.