Ind vs Eng 4th Test
दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह हे दोघेही दुखापतीमुळे या सामन्याबाहेर गेले आहेत.
नितीश रेड्डी याने गेल्या आठवड्यात लॉर्ड्स कसोटीत चांगली कामगिरी केली होती. मात्र २० जुलै रोजी झालेल्या जिम सेशनदरम्यान त्याच्या गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो चौथ्या कसोटीतून बाहेर गेला आहे. मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता नाही.
अद्याप कसोटी पदार्पण न केलेला अर्शदीप सिंहही दुखापतीमुळे मँचेस्टर कसोटी गमावणार आहे. सराव सत्रात त्याच्या गोलंदाजी करणाऱ्या हाताला इजा झाली आहे. अर्शदीपलाही संघातून वगळले जाणे ही भारतीय संघासाठी आणखी एक चिंता वाढवणारी गोष्ट आहे.
बर्मिंगहॅम कसोटीत शानदार कामगिरी करणारा आकाश दीपही खेळण्याच्या स्थितीत नसेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजी आणखी कमकुवत होण्याची चिन्हं आहेत.
दुसऱ्या कसोटीत नितीश रेड्डीची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्याने शार्दूल ठाकुरची जागा घेतली होती. बर्मिंगहॅममध्ये काहीसा शांत दिसला असला तरी तिसऱ्या कसोटीत त्याने चेंडूवर चमकदार कामगिरी करत भारताला वरच्या फळीतले बळी मिळवून दिले होते.
जसप्रीत बुमराहने याआधीच तीनपैकी दोन कसोटी सामने खेळले आहेत. सततच्या रेड-बॉल क्रिकेटमुळे मोहम्मद सिराजलाही दमछाक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संघातील खेळाडूंच्या दुखापतींच्या मालिकेमुळे कार्यभार व्यवस्थापन ही भारतासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.
लॉर्ड्स कसोटीत ऋषभ पंतच्या डाव्या हाताच्या बोटाला इजा झाली होती. त्यामुळे तो यष्टिरक्षकाची भूमिका निभावू शकत नाही. मँचेस्टर कसोटीत ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून खेळेल आणि पंत फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे.