पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका न्यूझीलंडमध्ये सुरु आहे. पहिल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने यजमान संघाचा दारुण पराभव केला. आता दुसरी कसोटी वेलिंग्टनमध्ये खेळवली जात आहे. या सामन्यामध्ये इंग्लंड संघाने 533 धावांची आघाडी घेतली आहे. तसेच न्यूझीलंड संघाचा एक डाव बाकी आहे. या सामन्यामध्ये अनेक विक्रम आणि रोमांचकारी घटना घडल्या. त्या आपण या बातमीत जाणून घेणार आहोत. (NZ VS ENG 2nd Test )
या मालिकेतील दुसरा कसोटी सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे इंग्लंडच्या नावावर होता. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या इंग्लंडने 280 धावा केल्या. यामध्ये हॅरी ब्रुकने दमदार शतक ठोकले. त्याचबरोबर ऑली पॉपने 66 धावांची तुफानी खेळी केली. पहिल्या डावामध्ये न्यूझीलंडकडून नेथन स्मिथने चार बळी, ऑर्क्यूने तीन बळी, तर हेन्रीने 2 बळी पटकावले.
इंग्लडचा संघ 280 धावांत सर्वबाद झाल्यानंतर यजमान संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरला. प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केवळ 86 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेला न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 34.5 षटकात केवळ 125 धावांवरच गारद झाला. न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने सर्वाधिक 37 धावांची खेळी खेळली. केन विल्यमसनशिवाय कर्णधार टॉम लॅथमने 17 धावा केल्या. इंग्लंडकडून या डावामध्ये गस ॲटकिन्सनची हॅट्रिक, ब्रेडन कार्सचे चार बळी, तसेच वोक्स आणि स्टोक्स यांनी एक एक बळी घेतला. या जोरावर इंग्लंडचा संघाकडे 155 धावांची आघाडी होती. ही आघाडी घेऊन ते दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीसाठी उतरले.
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांना अवघ्या नऊच्या धावसंख्येवर संघाला पहिला धक्का बसला. यानंतर जेकब बेथेल आणि बेन डकेट यांनी मिळून डाव सांभाळला. इंग्लंडकडून जेकब बेथेलने 96 धावांची शानदार खेळी केली. जो रूट नाबाद 73 आणि कर्णधार बेन स्टोक्स नाबाद 35 धावांसह खेळत आहे. आता दुसऱ्या दिवशीच्या स्टंप्सपर्यंत इंग्लंडच्या संघांने 5 गड्यांच्या मोबदल्यात 378 धावा बनवल्या आहेत. आता त्यांची एकून 533 धावांची निर्णायक आघाडी झाली आहे. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मॅट हेन्रीने पुन्हा एकदा न्यूझीलंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सनने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली घौडदौड सुरू आहे. शनिवारी (दि.7) वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने हॅट्ट्रिक नोंदवली आहे. ॲटकिन्सनने वेलिंग्टन येथे किवीजविरुद्ध हा पराक्रम गाजवला, त्याने नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि टिम साउथी यांना 35व्या षटकात लागोपाठ तीन बळी घेतले. 2017 नंतर हॅट्रिक घेणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू बनला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात फ्लॉप ठरलेल्या रूटने शनिवारी दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावले. वेलिंग्टन येथे दुसऱ्या दिवशी 106 चेंडूंत 73 धावा करून नाबाद राहिला. ज्यात 5 चौकारांचा समावेश होता. 33 वर्षीय रूटचे हे 65वे कसोटी अर्धशतक होते. यासोबतच रुटने कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकांचे 'शतक' पुर्ण केले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 35 कसोटी शतके झळकावली आहेत. त्याने राहुल द्रविडला पराभूत करून एक मोठा विक्रम केला आहे.
या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडने न्यूझीलंडवर 533 धावांची आघाडी घेतली आहे. या काळात इंग्लंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात 5 लाख धावा करणारा इंग्लंड पहिला संघ बनला आहे. इंग्लंड संघ हा आपला 1082 वा कसोटी सामना खेळत आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघ 4,28,868 धावा करून इंग्लंडनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या 2,78,751 धावा करून या विशेष यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.