Neeru Dhanda Wins Gold Medal Pudhari
स्पोर्ट्स

Neeru Dhanda Wins Gold: आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाने रचला इतिहास; ट्रॅप शूटिंगमध्ये भारताला सुवर्णपदक

Neeru Dhanda Wins Gold: नीरू धांडाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

Rahul Shelke

Neeru Dhanda Wins Gold: भारताच्या नीरू धांडाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. मंगळवारी झालेल्या महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक अंतिम फेरीत नीरूने एकूण 28 शॉट्सचे गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले.

आयची प्रीफेक्चर जनरल शूटिंग गॅलरी येथे ही अंतिम फेरी पार पडली. स्पर्धेदरम्यान पावसामुळे परिस्थिती आव्हानात्मक होती. मात्र, नीरूने आपला संयम कायम ठेवत शानदार कामगिरी केली. सुरुवातीपासूनच तिने प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळवली आणि अखेर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

नीरू धांडाच्या या कामगिरीमुळे भारतीय ट्रॅप शूटिंगच्या इतिहासात आणखी एक मोठी नोंद झाली आहे. यापूर्वी याच वर्षी इटलीमध्ये झालेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.

तसेच, गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियनशिपमध्येही नीरूने सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील या सुवर्णपदकामुळे नीरू धांडाने आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय शूटिंग क्षेत्राची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे.

48 वर्षांनंतर भारताला ट्रॅप शूटिंगमध्ये गोल्ड

ट्रॅप शूटिंगच्या स्पर्धेत भारताने शेवटचे वैयक्तिक गोल्ड मेडल 1978 मध्ये जिंकले होते. त्यावेळी पुरुषांच्या ट्रॅप शूटिंग वैयक्तिक स्पर्धेत रणधीर सिंह यांनी सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर तब्बल 48 वर्षे उलटली, मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेतील ट्रॅप शूटिंगच्या वैयक्तिक स्पर्धेत भारताला गोल्ड मिळवता आले नव्हते.

2026 हे वर्ष नीरू धांडासाठी शानदार ठरले आहे. याच वर्षी जुलैमध्ये त्या ट्रॅप शूटिंगमध्ये वर्ल्ड कप गोल्ड मेडल जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शूटर ठरल्या. इटलीमध्ये झालेल्या शॉटगन वर्ल्ड कपमधील ट्रॅप इव्हेंटमध्ये नीरू यांनी सुवर्णपदक पटकावले होते.

भारताचे 5वे गोल्ड

2026 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे 5वे सुवर्णपदक ठरले आहे. आतापर्यंत भारतासाठी महिला क्रिकेट संघ, महिला व पुरुष कबड्डी संघ, तसेच शूटिंगमध्ये कमलजीत आणि सुरुची सिंह यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. आता नीरू ढांढाच्या गोल्डची त्यात भर पडली आहे. नीरूच्या सुवर्णपदकासह भारताच्या एकूण पदकांची संख्या 47झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT