Neeru Dhanda Asian Games 2026
नवी दिल्ली : पत्र्याच्या डब्यांवर निशाणा साधत नेमबाजीची सुरुवात करणाऱ्या नीरू धांडाने मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. महिलांच्या ट्रॅप प्रकाराच्या अंतिम फेरीत नीरूने ३० पैकी तब्बल २८ गुण मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या या कामगिरीमुळे २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले. चीनच्या सन युनॉन्गने २६ गुणांसह रौप्य, तर कुवेतच्या हजर अब्दुलमलिकने २१ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
नीरूच्या २८ गुणांच्या कामगिरीने या प्रकारातील यापूर्वीचा आशियाई विक्रमही मोडला. यापूर्वीचा विक्रम २४ गुणांचा होता. अंतिम फेरीपूर्वी पात्रता फेरीतही नीरूने आपला दबदबा कायम ठेवला होता. तिने १२५ पैकी ११८ लक्ष्य भेदत अव्वल स्थान मिळवले होते. अंतिम फेरीतही तिने हीच लय कायम ठेवत कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले. या सुवर्णपदकामुळे भारताची २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकांची संख्या पाच, तर एकूण पदकांची संख्या ४७ झाली आहे.
नीरूचा नेमबाजीतील प्रवास प्रेरणादायी आहे. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकणारा तिचा मावस भाऊ लक्षय शेरॉन याच्याकडून तिला नेमबाजीची प्रेरणा मिळाली. सुरुवातीच्या काळात लक्षयने तिला स्वतःची बंदूकही वापरण्यासाठी दिली होती. पत्र्याच्या डब्यांवर निशाणा साधण्यापासून सुरू झालेला नीरूचा प्रवास आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकापर्यंत पोहोचला आहे. ज्या लक्षयकडून तिला प्रेरणा मिळाली, त्याच्याप्रमाणे तिने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या व्यासपीठावर स्थान मिळवले; मात्र सुवर्णपदक जिंकत तिने एक पाऊल पुढे टाकले.
नीरूच्या या वाटचालीत भारतीय लष्कराचाही मोठा वाटा आहे. ती लष्कराच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिसमध्ये नायब सुभेदार म्हणून कार्यरत आहे. महू येथील आर्मी मार्क्समनशिप युनिटमध्ये ती सराव करते. लंडन २०१२ ऑलिम्पिकमधील ट्रॅप प्रकाराचा सुवर्णविजेता पीटर विल्सन तिचा परदेशी प्रशिक्षक आहे.
नीरूने आज महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारातही भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नीरूसोबत आशिमा अहलावत आणि मनीषा कीर या भारतीय संघाचा भाग होत्या. भारतीय संघाने दुसरे स्थान मिळवले, तर चीनने सुवर्णपदक पटकावले. नीरूसाठी हे यश विशेष महत्त्वाचे आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने इटलीतील लोनाटो येथे झालेल्या ISSF विश्वचषकात इतिहास रचला होता. जुलैमध्ये तिने ट्रॅप प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील या सुवर्णपदकाने तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.