Neeraj Chopra performance in Doha Diamond League 2025
दोहा : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याने दोहा डायमंड लीगमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजला 90 मीटर लांबचे अंतर गाठता आले नव्हते आणि त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर नीरज खचला नाही आणि जोमाने पुन्हा तयारीला लागला. त्याचे फळ मिळताना दिसले.
शुक्रवारी डायमंड लीगमधील तिसर्या प्रयत्नात त्याने 90.23 मीटर लांब भाला फेकला. परंतु, त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात 91.06 मीटर लांब भालाफेक करून अव्वल स्थान पटकावले आणि नीरजकडून टायटल हिसकावले. ज्युलियननेही प्रथमच 90 मीटरचे अंतर कापले.
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज 89.45 मीटरपर्यंत भाला फेकू शकला होता. परंतु, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर भाला फेक करून सुवर्णपदक जिंकले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटरसह कांस्यपदक जिंकले. नव्वदीपार जाण्याचे त्याचे स्वप्न शुक्रवारी पूर्ण करताना 90.23 मीटर भाला फेकला. याबरोबरच 90 मीटरचे अंतर पार करणारा तो तिसरा आशियाई खेळाडू ठरला. यापूर्वी अर्शद (92.97 मी.) आणि तैवानचा चाओ-टीसून चेंग (91.36 मी.) यांनी हा पराक्रम केला आहे.
नीरजने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात 88.44 मीटर लांब भाला फेकला आणि आघाडी घेतली. शिवाय, त्याने पहिल्याच प्रयत्नात वर्ल्ड लीड घेतली. त्यानंतर अँडरसन पीटर्सने 85.64 मीटर व ज्युलियन वेबरने 83.82 मीटर अंतर कापले. भारताच्या किशोर जेनाने दुसर्या प्रयत्नात 78.60 मीटर लांब भाला फेक केली.
त्यानंतर नीरजने त्याच्या तिसर्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेक केली. त्याने प्रथमच 90 मीटरचे अंतर पार केले आणि स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने 2022 च्या स्टॉखोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर अंतर पार करून राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. ज्युलियन वेबरने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात 91.06 मीटर लांब भालाफेक करून अव्वल स्थान पटकावले आणि नीरजकडून टायटल हिसकावले. ज्युलियननेही प्रथमच 90 मीटरचे अंतर कापले.
नुकतीच लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी मिळवलेला नीरज चोप्रा ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई खेळांमध्ये दुहेरी पदक जिंकले. त्याने एकदा डायमंड लीग जिंकली आहे. चोप्राने 2020 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि असे करणारा तो पहिला आशियाई भालाफेकपटू बनला होता. 2023 मध्ये विजय मिळवल्यानंतर तो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला होता. 2016 मध्ये 20 वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशिपमधील त्याचा ज्युनियर भालाफेकीचा जागतिक विक्रम कायम ठेवला आहे.
पुरुषांच्या भालाफेकीत नीरज आता जागतिक आघाडीच्या गुणतालिकेत 23 व्या स्थानावर आहे. जर्मनीचा मॅक्स डेहनिंग 90.20 च्या गुणांसह आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केहरॉन वॉलकॉट 90.16 च्या गुणांसह 90 अधिक मीटरच्या यादीत चोप्राच्या मागे आहेत. चोप्राचे प्रशिक्षक चेक प्रजासत्ताकचे जान झेलेन्झनी 1996 मध्ये 98.48 मीटरच्या विश्वविक्रमासह जागतिक गुणतालिकेत आघाडीवर आहेत.
जगात 90 मीटरपेक्षा लांब भालाफेक करणार्या भालाफेकपटूंपैकी सहा जर्मनीचे, चार फिनलँडचे, दोन चेक प्रजासत्ताकचे, ग्रेनाडा, पाकिस्तान, केनिया, रशिया, ग्रीस, नॉर्वे, ग्रेट ब्रिटन, चायनीज ताईपेई, अमेरिका, लाटविया, एस्टोनिया आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रत्येकी 1-1 भालाफेकपटू आहेत, तर नीरज चोप्रा भारतातील एकमेव आहे.