Neeraj Chopra Diamond League 2025
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा शुक्रवारी (16 मे) मैदानात उतरणार आहे. नीरज दोहा डायमंड लीग 2025 मध्ये आपले आव्हान सादर करेल. त्याचे लक्ष्य या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेवर आहे, ज्यासाठी तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे.
दोहा येथे भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निरज चोप्राला येथे भरपूर पाठिंबा मिळेल. नीरजला दोन वेळा विश्वविजेता आणि पॅरिस ऑलिंपिक 2024 कांस्यपदक विजेता अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा), जेकब वडलेच (चेक प्रजासत्ताक), ज्युलियन वेबर आणि मॅक्स डेहनिंग (दोघेही जर्मनी), ज्युलियस येगो (केनिया), रॉडरिक डीन (जपान) यासारख्या खेळाडूंकडून आव्हानांचा सामना करावा लागेल.
टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरजने 2018 मध्ये पहिल्यांदा डायमंड लीगमध्ये भाग घेतला. त्यावेळी तो चौथ्या स्थानी राहिला. पण त्यानंतर 2023 च्या इव्हेंटमध्ये निरजने इतिहास रचत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यानंतर 2024 मध्ये तो दुस-या स्थानी राहिला.
भारताचा आणखी एक भालाफेकपटू किशोर जेना याने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तोही या स्पर्धेत सहभागी होईल. गेल्या वर्षी जेनाने 87.54 मीटरचा सर्वोत्तम फेक केला होता. तर मागिल दोहा डायमंड लीगमध्ये तो (76.31 मीटर) नवव्या स्थानावर राहिला.
दोहा डायमंड लीग 2025 मधील भारतीय खेळाडूंच्या इव्हेंटची सुरुवात भालाफेक स्पर्धेने होईल. ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार रात्री 10:13 वाजता सुरू होईल, तर पुरुषांची 5000 मीटर धावण्याची शर्यत रात्री 10:15 वाजता सुरू होईल तर महिलांची 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धा भारतीय वेळेनुसार रात्री 11:15 वाजता सुरू होईल.
दोहा डायमंड लीगचे भारतातील कोणत्याही चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जात नाही. भारतीय चाहते दोहा डायमंड लीगच्या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण डायमंड लीगच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजवर पाहू शकतात.
रात्री 8:18 : डिस्कस थ्रो (पुरुष)
रात्री 8:32 : पोल व्हॉल्ट (महिला)
रात्री 8:53 : टीपल जंप (महिला)
रात्री 9:34 : 400 मीटर शर्यत (महिला)
रात्री 9:40 : उंच उडी (पुरुष)
रात्री 9:43 : 800 मीटर शर्यत (पुरुष)
रात्री 9:54 : 110 मीटर अडथळा शर्यत (पुरुष)
रात्री 10:06 : 100 मीटर शर्यत (महिला)
रात्री 10:13 : भालाफेक (पुरुष) (नीरज चोप्रा आणि किशोर जेना)
रात्री 10:15 : 5000 मीटर शर्यत (पुरुष) (गुलवीर सिंग)
रात्री 10:38 : 1500 मीटर शर्यत (महिला)
रात्री 10:52 : 200 मीटर शर्यत (पुरुष)
रात्री 11:03 : 400 मीटर अडथळा शर्यत (पुरुष)
रात्री 11:14 : 3000 मीटर स्टीपलचेस (महिला) (पारुल चौधरी)