operation sindoor narendra modi stadium in ahmedabad
अहमदाबाद : आयपीएल (IPL 2025) हंगामात गजबजलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनला (GCA) मिळालेल्या मेलनंतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्यात 100 दहशतवाद्यांना ठार मारून भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यानंतर भारतात सर्वत्र सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेद्वारे मिळाली आहे.
जीसीएने अहमदाबाद पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत आणि या प्रकरणाची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात आयपीएलचे दोन महत्त्वाचे सामने या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. यामुळे अहमदाबादमध्ये केवळ स्टेडियमच नव्हे तर त्याच्या आसपासच्या परिसरातही चौकशी सुरू झाली आहे.
क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेली आयपीएल 2025 सध्या सुरू आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अनेक आयपीएल सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांदरम्यान, गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) ला एक धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये लिहिले आहे, ‘आम्ही तुमचे स्टेडियम उडवून देऊ’. हा ईमेल पाकिस्तानच्या नावाने जीसीएला आला आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम हे आयपीएल संघ गुजरात टायटन्सचे होम ग्राउंड आहे. या स्टेडियममध्ये गुजरातचे अनेक सामने खेळले गेले आहेत. गुजरात संघाचे पुढील दोन सामने याच मैदानावर आहेत. 14 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आणि 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध या लढती होणार आहेत.