PCB vs ICC T20 WC: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन नजम सेठी यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारनं टी २० वर्ल्डकप २०२६ मधील भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला त्यावर भाष्य केलं आहे. त्यांनी आयसीसीने पाय मागे खेचल्याचा अजब दावा केला.
कोलंबो इथं होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर पाकिस्तान सरकारनं बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याबाबत हस्तक्षेप केला. पाकिस्तानने यानंतर बहिष्काराचा निर्णय बदलला. आयसीसीने यावेळी पाकिस्तानवर मोठी आर्थिक कारवाई करण्याची आणि बंदीची देखील कारवाई करण्याचे संकेत दिले होते. यानंतर पाकिस्ताननं यू टर्न घेत आपला निर्णय बदलला.
मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी चेअरमन सेठी यांनी आयसीसीने यात माघार घेतली आहे पाकिस्तानने नाही असा दावा केला आहे.
इंडिया टुडेशी बोलताना सेठी म्हणाले, 'खरं तर आयसीसीने माघार घेतली आहे. मला वाटतं की आयसीसीने थोडी माघार घेतली आहे. बांगलादेशला थोडी स्पेस दिली. हा पाकिस्तानच्या दृष्टीकोणातून घेतलेला निर्णय आहे. त्यांनी सर्व अँगल तपासले. त्यांना माहिती होतं की भारताविरूद्धचा सामन्यावर बहिष्कार घालण्याच्या बाबतीत कोणतीही बंदी घालता येणार नाही. त्यांनी देशातील आणि बाहेरच्या देखील वरिष्ठ वकिलांशी चर्चा केली.'
सेठी पुढे म्हणाले, 'पाकिस्तानचे फक्त काही पॉईंट कमी होतील त्यापेक्षा जास्त काही होणार नाही. याची जाणीव आयसीसीला झाली. त्यानंतर आयसीसीने हालचाली केल्या आणि हा निर्णय बदलला. यामध्ये इम्रान ख्वाजा यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळंच यात बांगलादेशची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळेच ते पाकिस्तासोबत वाटाघाटी करण्यास आले आणि म्हणूनच पाकिस्तान हा सामना खेळण्याची शक्यता आहे.'
नजम सेठी यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा आयसीसीवर अवलंबून नाही असा देखील दावा केला. त्यांनी पाकिस्तान सुपर लीगच्या वाढती लोकप्रियतेचा हवाला दिला.
ते म्हणाले, 'रिसोर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक काळ असा होता की पाकिस्तान आयसीसीच्या रिसोर्सेसवर अलवंबून होती. इतर परदेशी क्रिकेट बोर्डांसारखं पाकिस्तान देखील आयसीसीवर अवलंबून होतं. मात्र आता तसं नाहीये. आता पाकिस्तानकडे पाकिस्तान सुपर लीग आहे. आता आम्हाला पाकिस्तान सुपर लिगमधून आयसीसी देते त्यापेक्षा जास्त पैसे मिळतात.'
ते पुढे म्हणाले, 'पाकिस्तानकडे आता स्वतःचे उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळं आयसीसीकडून येणारे पैसे हा विषयच नाही. मला वाटतं की मार्च महिन्यात तुम्हाला आयसीसीकडून पाकिस्तानला अजून काही सलवलती मिळालेल्या आपणाला दिसून येतील.'