Mustafizur Rahman Play IPL 2026: मुस्तफिजूर रहमान हा आयपीएल २०२६ मध्ये खेळणारा एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे. मात्र लिलावानंतर त्याला घेणाऱ्या केकेआर वादाच्या भोवऱ्यात सापडला. बांगलादेशी खेळाडूंवर आयपीएलवर बंदी घालावी अशी मागणी होत आहे. आता यावर बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भारत-बांगलादेश यांच्यातील राजकीय नातं हे बिघडत चाललं आहे. असं असतानाही बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्याची शक्यता आहे. याबाबत वादंग निर्माण झाल्यावर बीसीसीआयने देखील भूमिका स्पष्ट केली आहे. बीसीसीआयने सध्याच्या घडीला बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. त्यांनी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे सांगितले. बीसीसीआय सरकारच्या निर्देशांची वाट पाहत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
मुस्तफिजूर रहमान आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये सोल्ड होणारा एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे. केकेआरने मुस्तफिजूरला ९.२० कोटी रूपयाला त्याला आपल्या संघात घेतलं. मात्र लिलावानंतर केकेआरविरूद्ध सोशल मीडियावर भरपूर टीका झाली होती. चाहत्यांनी आणि काही राजकीय नेत्यांनी देखील बांगलादेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यावरून प्रश्न विचारले होते.
त्यावर आता बीसीसीआयचे स्पष्टीकरण आलं आहे. त्यांनी सरकारच्या आदेशाशिवाय बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालण्यात येणार नाही. गेल्या वर्षी बीसीसीआयने टीम इंडियाचा बांगलादेश दौरा हा सरकारचे निर्देश आल्यावर स्थगित केला होता. २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात शेख हसिना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशमध्य राजकीय अस्थैर्य निर्माण झालं आहे. अनेक आंदोलनांना हिंसक वळण लागलं आहे.
डिसेंबर महिन्यात ढाकामधील भारतीय दुतावासाबाहेर विरोध प्रदर्शन झालं होतं. त्यानंतर भारतानं व्हिसा सेंटर बंद केलं होतं. त्यानंतर बांगलादेशनेही भारतीय नागरिकांना व्हिसा देणं बंद केलं होतं. यामुळं वातावरण अजूनच तणावपूर्ण झालं.
दरम्यान, बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्स शी बोलताना सांगितलं की, 'सध्याची परिस्थिती संवेदनशील आहे. आम्ही सतत सरकारसोबत संपर्कात आहोत. सध्याच्या घडीला बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे असं काही नाही. मुस्तफिजूर आयपीएल खेळेल. बांगलादेश काही शत्रू राष्ट नाही.'
असं असलं तरी मुस्तफिजूरची आयपीएलसाठीची उपलब्धता अजून निश्चित झालेली नाही. एप्रिल महिन्यात बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे आणि टी २० मालिका खेळली जाणार आहे. जर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं मुस्तफिजूरला एनओसी दिली नाही तर तो आयपीएलचे अनेक सामने खेळू शकणार नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्याला एनओसी न मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच मुस्तफिजूर स्वतःच आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो.