मुंबई : IPL 2025 च्या थरारक हंगामात मुंबई इंडियन्ससाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. संघाचा महत्वाचा डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. संघ व्यवस्थापनाने ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली. त्यानंतर एमआयच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरवली आहे.
एका सराव सत्रादरम्यान विघ्नेशला गंभीर दुखापत झाली. वैद्यकीय चाचणीत लीगामेंट स्ट्रेसचे निदान झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला किमान 8 ते 10 आठवड्यांचा पुनर्वसन कालावधी लागणार आहे. त्यामुळे उर्वरित IPL मध्ये तो खेळणे अशक्य आहे.
विघ्नेश पुथूरने हंगामाच्या सुरुवातीस प्रभावी प्रदर्शन करून संघात स्वतःचं स्थान पक्कं केलं होतं. त्याने अचूक फिरकी मा-याच्या जोरावर विरोधी संघाच्या मधल्या फळीला अनेक चकवले आहे. एमआयला महत्त्वाच्या क्षणी याचा फायदा झाला आहे. विघ्नेशने एकूण 5 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 18.17 च्या सरासरीने 6 विकेट्स घेतल्या.
‘विघ्नेशच्या दुखापतीची बातमी आमच्यासाठी अत्यंत दु:खद आहे. तो लवकर तंदुरुस्त होईल अशी आशा आहे,’ असे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी सांगितले. मुंबईच्या बेंच स्ट्रेंथमध्ये काही प्रतिभावान स्पिनर आहेत, पण विघ्नेशसारख्या अष्टपैलू खेळाडूचा पर्याय मिळवणं ही एक कठीण जबाबदारी असेल.
मुंबई इंडियन्सने विघ्नेशच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणा केली आहे. संघ व्यवस्थापनाने उर्वरित हंगामासाठी लेग-स्पिनर रघु शर्माला स्थान दिले आहे. रघुने पंजाब आणि पुद्दुचेरीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. ज्यामध्ये त्याने 11 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 19.59 च्या सरासरीने एकूण 57 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी 56 धावांमध्ये 7 विकेट्स आहे. तर रघु शर्माने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 9 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. रघुने आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये तीन विकेट घेण्यात यश मिळवले आहे. मुंबई इंडियन्स संघाने रघु शर्माला त्याच्या 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर संघात स्थान दिले आहे.
मुंबई 10 सामन्यांत सहा विजय आणि चार पराभवांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे आणि राजस्थानवर विजय मिळवल्यास ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचतील.