Mukul Chaudhary file photo
स्पोर्ट्स

Mukul Chaudhary: अर्जुन तेंडुलकरने आधीच सांगितलं होतं, अन् केकेआरचा शेवटच्या षटकात बाजार उठला, व्हिडिओ व्हायरल

Arjun Tendulkar on Mukul Chaudhary: ७ षटकार ठोकून लखनौला विजय मिळवून देणारा मुकुल चौधरी सध्या चर्चेत आहे. क्रिकेट विश्वात मुकुल हे नाव नवीन असले, तरी अर्जुन तेंडुलकरने त्याच्या षटकारांची भविष्यवाणी आधीच केली होती.

मोहन कारंडे

Mukul Chaudhary:

कोलकाता: आयपीएलच्या रिंगणात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सात षटकार ठोकून लखनौ सुपर जायंट्सला विजय मिळवून देणारा मुकुल चौधरी सध्या चर्चेत आहे. क्रिकेट विश्वात मुकुल हे नाव नवीन असले, तरी अर्जुन तेंडुलकरने त्याच्या गगनचुंबी षटकारांची भविष्यवाणी आधीच केली होती. मुकुलच्या या खेळीनंतर अर्जुनचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी एका मुलाखतीत अर्जुन तेंडुलकरने मुकुल चौधरीच्या फलंदाजीचे तोंडभरून कौतुक केले होते. जेव्हा त्याला विचारले की, "सरावादरम्यान गोलंदाजी करताना तुला असा कोणता खेळाडू भेटला जो खूप षटकार मारतो?" तेव्हा अर्जुनने क्षणाचाही विलंब न लावता मुकुल चौधरीचे नाव घेतले.

अर्जुन म्हणाला होता की, "मुकुलची षटकार मारण्याची क्षमता अफाट आहे. सराव सामन्यात त्याने माझ्या गोलंदाजीवर मैदानाच्या चहुबाजूला षटकार ठोकले होते. तो स्क्वेअर लेग, पॉईंट आणि अपर कट यांसारखे फटके अगदी सहज खेळू शकतो." विशेष म्हणजे अर्जुन तेंडुलकर दीर्घकाळ मुंबई इंडियन्सचा भाग होता, मात्र यंदाच्या लिलावात त्याला लखनऊ सुपर जायंट्सने संघात सामील करून घेतले आहे.

'धोनी स्टाईल' हेलिकॉप्टर शॉट

ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या सामन्यात मुकुलने सुरुवातीच्या ८ चेंडूंमध्ये केवळ २ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याने गिअर बदलला आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने वैभव अरोराच्या चेंडूवर महेंद्रसिंह धोनीच्या शैलीत मारलेला 'हेलिकॉप्टर शॉट' प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

शेवटच्या षटकातील थरार

सामन्याच्या शेवटच्या षटकात लखनऊला विजयासाठी १४ धावांची गरज होती. गोलंदाज वैभव अरोरा दबावाखाली असताना मुकुलने याचा फायदा घेतला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने धावसंख्या बरोबरीत आणली आणि शेवटच्या चेंडूवर धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. मुकुलचा हा आयपीएल कारकिर्दीतील केवळ तिसराच सामना होता, मात्र आपल्या अष्टपैलू फटकेबाजीने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT