MS Dhoni Limping Video IPL 2026 Pudhari
स्पोर्ट्स

MS Dhoni Video: ‘धोनी नीट चालू शकत नाही?’ IPL आधी व्हिडिओ व्हायरल; फिटनेसवर प्रश्नचिन्ह, चाहते चिंतेत

MS Dhoni Limping Video IPL 2026: IPL 2026 आधी सरावादरम्यान एमएस धोनी लंगडत चालताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या फिटनेसबाबत चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Rahul Shelke

MS Dhoni Limping Video IPL 2026: IPL 2026 सुरू होण्याआधीच MS धोनीबाबत चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. सराव सत्रादरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात धोनी थोडा लंगडत चालताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत आणि आगामी हंगामात तो किती सामने खेळेल, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियम येथे झालेल्या सरावादरम्यान हा प्रसंग घडला. 44 वर्षीय धोनी मैदानाबाहेर येताना थोडा अस्वस्थ वाटत होता. त्याच्या हालचालींमध्ये नेहमीसारखी चपळता दिसत नव्हती, ज्यामुळे चाहते चिंतेत आहेत.

धोनी फिटनेससाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. त्याला अशा अवस्थेत पाहून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर काहींनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, तर काहींनी त्याच्या जिद्दीचे कौतुक करत भावनिक प्रतिक्रिया दिल्या.

धोनीच्या फिटनेसचा प्रश्न नवीन नाही. गेल्या काही वर्षांपासून तो गुडघ्याच्या समस्येने त्रस्त आहे. IPL 2023 नंतर त्याने गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील केली होती. त्यानंतरही डाव्या गुडघ्यात अधूनमधून त्रास होत असल्याचे दिसून आले आहे, ज्याचा परिणाम त्याच्या धावण्यावर आणि हालचालींवर होत आहे. तरीही, या सगळ्या अडचणी असूनही धोनी IPL 2026 साठी जोरदार तयारी करत आहे. जिम, स्विमिंग आणि पॉवर-हिटिंग सरावावर तो विशेष भर देत आहे.

Chennai Super Kings साठी धोनी आजही अत्यंत महत्त्वाचा आहे. संघाचे नेतृत्व आता ऋतुराज गायकवाड करत असला, तरी अनुभव आणि निर्णयक्षमता या बाबतीत धोनीचा प्रभाव कायम आहे. विशेषतः सामना अटीतटीचा असताना त्याचे मार्गदर्शन संघासाठी निर्णायक ठरते.

दरम्यान, CSK संघालाही दुखापतींचा फटका बसला आहे. नॅथन एलिस IPL 2026 मधून बाहेर झाला असून मॅथ्यू शॉर्ट सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही. अशा परिस्थितीत धोनीची उपस्थिती संघासाठी अधिकच महत्त्वाची आहे. CSK आपला पहिला सामना 30 मार्च रोजी Rajasthan Royals विरुद्ध गुवाहाटी येथे खेळणार आहे. या सामन्यापूर्वी धोनीच्या फिटनेसची चर्चा होत आहे.

एकूणच, धोनीला अशा अवस्थेत पाहणे चाहत्यांसाठी वेदनादायी आहे. पण त्याने एक गोष्ट वारंवार सिद्ध केली आहे, ती म्हणजे अडचणी कितीही मोठ्या असल्या, तरी ‘कॅप्टन कूल’ नेहमीच त्यावर मात करण्याचा मार्ग शोधतो. आता IPL 2026 मध्येही तेच चित्र पाहायला मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT