धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीच्‍या निर्णयानंतर सीएसकेने आपल्या लाडक्या 'थाला'च्या सन्मानार्थ चेपॉक स्टेडियमचे आकाश उजळून काढले.  Photo X
स्पोर्ट्स

MS Dhoni CSK Drone Show | "आमच्या 'थाला'साठी..." ; एम. एस. धोनीच्या सन्मानार्थ 'चेन्नई सुपर किंग्स'चा भव्य ड्रोन शो

MS Dhoni IPL retirement CSK drone show : 'आयपीइल'मधून निवृत्ती घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीला अनोखा निरोप

पुढारी वृत्तसेवा

MS Dhoni IPL retirement CSK drone show : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) यष्टीरक्षक आणि फलंदाज महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी आयपीएलमधून (IPL) निवृत्ती जाहीर केली. आता यापुढे आयपीएलमध्‍ये धोनी खेळताना दिसणार नाही, या भावनेने कोट्यवधी चाहत्यांना मोठा धक्‍का बसला आहे. धोनीच्या या निर्णयानंतर सीएसकेने आपल्या लाडक्या 'थाला'च्या सन्मानार्थ चेपॉक स्टेडियमचे आकाश उजळून काढले. एका खास ड्रोन शोच्या माध्यमातून चेन्नईच्या संघाने धोनीला अनोखा निरोप दिला.

धोनीने तब्‍बल १७ हंगाम भूषवले चेन्‍नईचे कर्णधारपद

२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच धोनी सीएसकेचा अविभाज्य भाग राहिला आहे. तब्बल १७ हंगामांत त्याने कर्णधार आणि खेळाडू म्हणून संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. आता पुढील वर्षापासून तो सीएसकेच्या 'मेंटॉर'ची (मार्गदर्शक) नवीन जबाबदारी सांभाळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीसाठी खास ड्रोन शो

चेन्नई सुपर किंग्सने आयोजित केलेल्या या नेत्रदीपक ड्रोन शोमध्ये सुरुवातीला आकाशात माहीची प्रतिमा साकारण्यात आली. यावर 'फॉर अवर थाला' (आमच्या थालासाठी) असा संदेश झळकला. त्यानंतर सिंहाची प्रतिकृती आणि पुन्हा धोनीचा चेहरा आकाशात रेखाटला गेला.

संघाचा नवा मेंटॉर म्हणूनही अनोख्या पद्धतीने स्वागत

या शोमध्ये धोनीचा ट्रेडमार्क 'हेलिकॉप्टर शॉट' आणि यष्टीमागील त्याची चपळ स्टंपिंगची कलाही ड्रोनच्या माध्यमातून जिवंत करण्यात आली. शेवटी त्याची सुप्रसिद्ध '७ नंबर'ची जर्सी आणि त्यावर 'थाला फॉरेवर' (थाला सदैव) असे शब्द उमटले. यासोबतच, संघाचा नवा मेंटॉर म्हणूनही त्याचे आकाशात अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा दबदबा

धोनीच्या कर्णधारपदाखाली सीएसकेने आयपीएलमध्ये आपले वर्चस्व गाजवले. या काळात चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावले. इतकेच नाही, तर १० वेळा अंतिम फेरीत (फायनल) धडक मारली आणि १२ वेळा प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले.धोनीने २०२४ मध्ये ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा सोपवली होती. कर्णधारपद सोडल्यानंतरही तो संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनून राहिला. त्याने २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता, तर २०२६ च्या हंगामात पोटरीच्या दुखापतीमुळे (काफ इंजरी) त्याला मैदानापासून दूर राहावे लागले.आपल्या प्रदीर्घ आयपीएल कारकिर्दीत धोनीने एकूण २७८ सामने खेळले.३८.३० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या स्ट्राईक रेटने ५,४३९ धावा फटकावल्या आहेत. यामध्‍ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT