MS Dhoni twitter csk
स्पोर्ट्स

MS Dhoni: CSK चं टेन्शन वाढलं! धोनी २ आठवडे खेळणार नाही; काय आहे कारण?

IPL 2026: आयपीएलच्या १९ व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत असतानाच, चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे.

मोहन कारंडे

MS Dhoni

चेन्नई: आयपीएलच्या १९ व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत असतानाच, चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आधारस्तंभ आणि माजी कर्णधार एम.एस. धोनी पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे या हंगामातील पहिल्या दोन आठवड्यांतील सामने खेळणार नाही. फ्रँचायझीने आज अधिकृतपणे ही माहिती दिली.

धोनी सध्या या दुखापतीतून सावरण्यासाठी 'रिहॅबिलिटेशन' प्रक्रियेतून जात असल्याचे सीएसकेने सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे. सोमवारी चेन्नईचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतरच्या पहिल्या दोन आठवड्यांत संघाला पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि दिल्ली कॅपिटल्स या बलाढ्य संघांचा सामना करायचा आहे. या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धोनी मैदानात दिसणार नाही.

यष्टीरक्षणाची धुरा कोणाकडे?

धोनीच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची जबाबदारी कोणाकडे असेल, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. या शर्यतीत संजू सॅमसनचे नाव आघाडीवर आहे. सॅमसन यंदा कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत सलामीला फलंदाजी करणार आहे. याशिवाय, चेन्नईकडे उर्वील पटेल आणि युवा खेळाडू कार्तिक शर्मा हे दोन पर्यायही उपलब्ध आहेत.

गेल्या वर्षी धोनीने सर्व १४ सामने खेळले होते. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने १३ डावांत १३५.१७ च्या स्ट्राईक रेटने १९६ धावा केल्या होत्या. मात्र, सांघिक कामगिरीत चेन्नईचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला होता. २०२५ च्या हंगामात केवळ ४ विजय मिळवून चेन्नई गुणतालिकेत तळाला होती.

दुखापतींचे सत्र सुरूच

धोनीच्या दुखापतीपूर्वी चेन्नईला नॅथन एलिसच्या रूपाने मोठा धक्का बसला होता. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्याच स्पेन्सर जॉन्सनला संघात सामील करण्यात आले आहे. जॉन्सन आता मॅट हेन्री, खलील अहमद आणि शिवम दुबे यांच्यासोबत वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT