mohammed siraj icc players of the month for august
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला लोळवत पराभवाची धूळा चारली. या विजयाचा आनंदोत्सव सुरू असतानाच चाहत्यांसाठी आणखीन खुशखब मिळाली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि इंग्लंड विरुद्धच्या ओव्हल कसोटी विजयाचा नायक मोहम्मद सिराजने आयसीसी पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. दमदार गोलंदाजीच्या जोरावर सिराज ओगस्ट महिन्यासाठी आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ ठरला आहे.
सध्या सिराज आशिया चषकमध्ये टीम इंडियाचा भाग नाही. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील त्याच्या अविस्मरणीय कामगिरीचे त्याला बक्षिस मिळाले आहे. पुरस्काराच्या या शर्यतीत त्याने न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि वेस्ट इंडिजचा जेडन सील्स यांना मागे टाकत आपला ठसा उमटवला.
सिराजने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील निर्णायक पाचव्या सामन्यात अखेरच्या दिवशी अप्रतिम गोलंदाजी करत भारताला ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. त्याने या सामन्यात एकूण ९ बळी घेतले, ज्यात पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळींचा समावेश होता. त्याच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्यात यश आले.
त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. हा स्टार वेगवान गोलंदाज इंग्लंडमध्ये अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचही सामन्यांमध्ये खेळला आणि सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या. जूनच्या अखेरीस सुरू झालेली ही मालिका ऑगस्टच्या सुरुवातीला संपली. सिराजने मालिकेत १८५.३ षटके गोलंदाजी केली पण त्याच्या वेगावर कोणताही परिणाम झाला नाही.
पुरस्कार मिळाल्यानंतर सिराजने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड होणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. नुकतीच खेळली गेलेली अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिका खूप अविस्मरणीय राहिली. मालिकेतील प्रत्येक सामना हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण होते. महत्त्वाच्या वेळी भारतीय संघासाठी योगदान देता आल्याचा मला अभिमान आहे. इंग्लंडमधील परिस्थितीत त्यांच्या मजबूत फलंदाजीसमोर गोलंदाजी करणे आव्हानात्मक होते, पण त्यामुळेच मलाही सर्वोत्तम कामगिरी करण्यात यश आले.’
सिराज पुढे म्हणाला की, ‘आयसीसीचा हा पुरस्कार जितका माझा आहे, तितकाच तो माझ्या सहकाऱ्यांचा आणि सपोर्ट स्टाफचा देखील आहे. त्यांच्या सततच्या प्रोत्साहन आणि विश्वासामुळे मला प्रेरणा मिळाली. मी पुढेही कठोर परिश्रम करत राहीन आणि भारताची जर्सी परिधान करून नेहमीच माझे सर्वोत्तम योगदान देईन,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.
महिला गटात आयर्लंडची अष्टपैलू खेळाडू ओर्ला प्रेंडरगॅस्टला ऑगस्ट महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवडण्यात आले आहे. तिने पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या टी-२० मालिकेत १४४ धावा केल्या आणि ४ बळी घेतले, ज्यामुळे तिच्या संघाने मालिका २-१ अशी जिंकली. याशिवाय, तिने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक युरोप पात्रता फेरीमध्ये शानदार कामगिरी करताना ऑगस्ट महिन्यात एकूण २४४ धावा केल्या आणि ७ बळी मिळवले.