कानपूर- सिराजने मागे डाइव्ह मारत एका हाताने शाकीबचा झेल पकडला. (Image source- BCCI)
स्पोर्ट्स

जबरदस्त! मागे डाइव्ह मारत 'सिराज'ने टिपला अविश्वसनीय झेल (पाहा Photos)

Mohammed Siraj | कानपूरच्या मैदानावर सिराजची कमाल

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारत- बांगला देश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आज सोमवारी (दि.३० सप्टेंबर) चौथ्या दिवसाचा (IND vs BAN 2nd Test Day 4) खेळ सुरु आहे. कानपूरमधील ग्रीन पार्क मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. दुसरा आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न खेळता वाया गेला होता. बांगला देशने आज सोमवारी १०७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पण टीम इंडियाने पहिल्या सत्रांत बांगला देशच्या ३ विकेट घेतल्या. पण मोमिनूल हक याने शतकी खेळी करत बांगला देशचा डाव सावरला होता. पण लंचब्रेकनंतर बांगला देशचा डाव गडगडला. यामुळे आज, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच बांगला देशचा पहिला डाव सर्वबाद २३३ धावांवर गुंडाळला. बुमराह ३, सिराज, अश्विन आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी २ तसेच रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. बांगला देशच्या ३५ वर्षीय मोमिनूल हकने १७२ चेंडूत शतकी खेळी केली.

सिराजने टिपला अप्रतिम झेल

आज पहिल्या सत्रातील खेळादरम्यान मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर कमाल केली. सिराज आज गोलंदाजीसह उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही बनला, जेव्हा ५६ व्या षटकांत अश्विनने शाकीब अल हसनची (Shakib Al Hasan) विकेट घेतली. अश्विनच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने शाकीबचा अप्रतिम झेल टिपला. विशेष म्हणजे सिराजने मागे डाइव्ह मारत एका हाताने झेल पकडत कानपूरमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली. याआधी कर्णधार रोहित शर्मा याने एका हाताने झेल टिपत लिटन दासला तंबूत पाठवले. त्यानंतर सिराजने पाठीमागे झोकून देत शाकीबचा डोळ्याचे पारणे फेडणारा झेल टिपला. या क्षणाचे फोटो बीसीसीआयने X वर शेअर केले आहेत.

दरम्यान, बांगला देशचा फलंदाज मोमिनूल हक ९५ धावांवर खेळत असताना विराट कोहलीने स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला. मात्र, हा झेल सोपा नव्हता. यामुळे मोहम्मद सिराजच्या चेंडूवर मोमिनूलला जीवदान मिळाले. त्यानंतर मोमिनूलने शतक पूर्ण करून बांगला देशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मोमिनूलचे कसोटीतील १३ वे शतक

३५ वर्षीय मोमिनूलने १७२ चेंडूत शतकी खेळी केली. कसोटीतील त्याचे हे १३ वे शतक आहे. मोमिनूल हा भारतात कसोटी शतक झळकावणारा बांगला देशचा दुसरा फलंदाज ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT