Mohammad Siraj India vs England 2nd Test
एजबॅस्टन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आपली तुटलेली बॅट पाहून चांगलाच चिडला. त्याचा तो राग खरा होता की केवळ दिखावा, हे कळू शकले नाही, कारण काही क्षणांतच सिराज हसू लागला.
एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोहम्मद सिराज फलंदाजीच्या सरावात अतिरिक्त मेहनत करत आहे. सराव सत्रादरम्यान, सिराजला त्याची बॅट तुटल्याचे आढळले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात सिराज हातात बॅट घेऊन आपल्या सहकारी खेळाडूंना विचारत आहे, "माझी बॅट कशी तुटली?" व्हिडिओ क्लिपमध्ये तो, "माझी बॅट कशी तुटली? कोणी तोडली माझी बॅट?" असे विचारताना दिसत आहे. काही खेळाडू नेटमध्ये सराव करत असल्याचेही दिसत आहेत. सिराज बॅटबद्दल ज्या खेळाडूंना विचारत आहे, ते व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत नाही. व्हिडिओमध्ये सिराज सुरुवातीला रागात दिसतो. असे वाटते की, तो बॅटबद्दल ज्याला विचारत आहे, त्याच्याकडे रागाने पाहत आहे. पण लगेचच तो हसायला लागतो, ज्यामुळे तेथील वातावरण हलकेफुलके होते.
इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने पिछाडीवर आहे. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ५ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे एजबॅस्टनमध्ये विजय मिळवून इंग्लंडला आपली आघाडी मजबूत करण्यापासून रोखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे खेळणे अनिश्चित असल्याने मोहम्मद सिराजवर मोठी जबाबदारी असणार आहे.