स्पोर्ट्स

India vs Pakistan T20 2026 | "माझं हृदय रडतंय...." : पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने 'पीसीबी' अध्यक्ष नक्वींवर डागली तोफ

India vs Pakistan T20 World Cup 2026 |पाकिस्तान क्रिकेट बोर्डमधील राजकारण हद्दपार करण्याचेही केले आवाहन

पुढारी वृत्तसेवा

India vs Pakistan T20 World Cup 2026

इस्‍लामाबाद : "पाकिस्तान क्रिकेटमधून राजकारणासह वैयक्तिक अजेंडा हद्दपार होत नाही तोपर्यंत पूर्वीचा संघ होऊ शकत नाही. भारताविरोधातील पराभव हा आपल्या क्रिकेट इतिहासातील सर्वात काळा काळ आहे. माझे हृदय रडत आहे. अक्षम व्यक्तींना पदावरून आणि संघातून काढून टाकले पाहिजे," अशा शब्दांमध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख आणि देशाचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागली.

पाकिस्तान क्रिकेट संघावर चौफेर टीका

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये रविवारी (दि. १६) भारताने पाकिस्तानचा पराभव केला. तब्बल ६१ धावांनी झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर चौफेर टीका होत आहे. पराभवामुळे पाकिस्तानच्या 'सुपर-८' फेरीतील प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली असून, खराब 'नेट रन रेट'मुळे नामिबियाविरुद्धचा पुढील सामना आता त्यांच्यासाठी 'करो या मरो' असा ठरणार आहे.

मोहम्मद युसूफ यांनी केला क्रिकेटमधील राजकारणावर प्रहार

मोहम्मद युसूफ यांनी 'X' पोस्टमध्ये अत्यंत कठोर शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, जर पाकिस्तानमध्ये क्रिकेट टिकवायचे असेल, तर या खेळाला राजकीय प्रभाव आणि वैयक्तिक अजेंड्यापासून दूर ठेवावे लागेल. जोपर्यंत आपण पाकिस्तान क्रिकेटमधून राजकीय हस्तक्षेप आणि वैयक्तिक स्वार्थ काढून टाकत नाही, तोपर्यंत आपण पूर्वीसारखा संघ बनू शकणार नाही. हा आपल्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात काळा कालखंड आहे आणि हे पाहून माझे हृदय रडत आहे. अकार्यक्षम व्यक्तींना तातडीने पदावरून आणि संघातून हटवले पाहिजे," अशा शब्दांत युसूफ यांनी तोफ डागली. त्यांचे हे विधान थेट पीसीबी (PCB) अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडे रोख असल्याचे मानले जात आहे.

वादाच्‍या भोवऱ्यात मोहसिन नक्वी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद भूषवल्यापासून नक्वी यांचे अनेक निर्णय वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. 'आशिया चषक २०२५' दरम्यान, भारतीय संघाने त्यांच्या हातून चषक स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी चषकच व्यासपीठावरून हटवला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, या कृत्याबद्दल पाकिस्तान सरकारने त्यांचा गौरव केला होता.

बहिष्काराचे नाट्य अन् मानहानीकारक पराभव

टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी नक्वी यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेऊन भारतावर बहिष्कार टाकण्याबाबत चर्चा केली होती. आयसीसीने बांगलादेशला विश्वचषकातून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ हा पवित्रा घेण्यात आला होता. लाहोरमध्ये आयसीसी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या अनेक बैठकीनंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला. मात्र, या संपूर्ण नाट्यामुळे नक्वी यांचे प्राधान्य क्रिकेटला नसून राजकारणाला असल्याचे स्पष्ट झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT